उत्तम सेवेसाठी पैसे मोजण्यास तयार असलेल्या प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्याचा चंग राज्य परिवहन महामंडळाने बांधला असून त्यासाठी एसटी महामंडळ तीन कोटी रुपये खर्च करून दोन आलिशान व अत्याधुनिक बसगाडय़ा विकत घेणार आहे. या गाडय़ा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पुणे या मार्गावर धावणार असून या गाडय़ांमध्ये खानपान व्यवस्थेसह आरामदायक आसनव्यवस्था, वाय-फाय सुविधा, मनोरंजनासाठी स्वतंत्र छोटी स्क्रीन अशा अनेक सुखसोयी असतील.
विमानतळावरून खासगी टॅक्सीने पुण्याकडे रवाना होणाऱ्या प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी एसटीने हे पाऊल टाकले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खासगी टॅक्सी करून तसेच काही ट्रॅव्हल कंपन्यांच्या बसने पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. या प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवत एसटी महामंडळाने स्कॅनिया कंपनीच्या दोन आलिशान बसगाडय़ा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या एका बसची किंमत दीड कोटी एवढी आहे. उत्तम सस्पेन्शन असलेल्या या बसगाडय़ा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील, असे खंदारे यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पुणे या मार्गावर एसटी महामंडळाने सर्वेक्षणही केले. या सर्वेक्षणानुसार या मार्गावर खासगी टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळले. यातील किमान ६० टक्के प्रवाशांना एसटी महामंडळाकडे आकर्षित करण्याची महामंडळाची योजना आहे. खासगी टॅक्सीचे भाडे १००० ते १२०० रुपये असून एसटी महामंडळ आपल्या या आलिशान बसचे तिकीट हजार रुपयांच्या आसपास ठेवण्याची शक्यता आहे, असेही खंदारे यांनी सांगितले. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ११० एसी शिवनेरी बसगाडय़ांपैकी ७० गाडय़ा जून्या अथवा नादुरुस्त आहेत. या गाडय़ा एसटीच्या ताफ्यातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी ३५ गाडय़ा व्होल्वो कंपनीच्या आणि ३५ गाडय़ा स्कॅनिया कंपनीच्या असतील. या गाडय़ांपैकी दहा बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून १५ गाडय़ा येत्या महिन्याभरात दाखल होणार आहेत. तर उर्वरित गाडय़ा पुढील तीन महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत येतील, असे खंदारे यांनी सांगितले.
बसमध्ये उत्तम सुविधा
या बसमध्ये स्वतंत्र खानपान व्यवस्था, प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र छोटी स्क्रीन, वाय-फाय सुविधा, आरामदायक आसनव्यवस्था आदी सुखसोयी असतील.
प्रामुख्याने मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ‘शिवनेरी’च्या ताफ्यातील ७० बसगाडय़ांच्या जागीही नव्याकोऱ्या गाडय़ा घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
-संजय खंदारे,  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

Story img Loader