पर्यटकांसाठी कोकणात आलिशान व्हॉल्वो बसेस सुरू करण्याची योजना महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने अखेर बासनात गुंडाळली असून कोकणातील नागमोडय़ा आणि अरूंद रस्त्यांवर आता एसटी महामंडळाची लक्झरी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने कोकणात पर्यटनस्थळांचा विकास करताना देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई, पुण्यातून आलिशान व्हॉल्वो बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने काही खासगी वाहतूक कंपन्यांशी सहकार्य करार केला होता. विदेशी पर्यटकांना कोकणची सैर घडविण्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून पाच व्हॉल्वो बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या. या बसेसमध्ये शौचालय, फ्रिज, ओव्हन, वायफाय सेवा आदी सुविधा होत्या. मात्र या बसेसची लांबी कोकणातील नागमोडय़ा, अरुंद रस्त्यांमध्ये अडथळा ठरल्याने त्या उभ्या करून ठेवण्यात आल्या. खासगी टूर ऑपरेटर्सनीही पर्यटन महामंडळाच्या प्रस्तावावर पसंती दर्शवली नव्हती. परिणामी आता एसटी महामंडळाच्या लक्झरी बसेस पर्यटन विकास महामंडळाने आखलेल्या मार्गावरून पर्यटकांना घेऊन जातील. मात्र याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते.
पर्यटन महामंडळाने खरेदी केलेल्या आलिशान व्हॉल्वो बसेस आता नागपूरमधील जंगल पर्यटन, औरंगाबाद, नाशिक, मुंबईतील स्थानिक पर्यटन सहली, तसेच मुंबई विमानतळ ते शिर्डी आणि पुणे आदी मार्गावर धावणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा