मुंबई : ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत अवघ्या महिनाभरात ४ कोटी २२ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास करून प्रतिसाद दिला आहे. ‘महिला सन्मान योजने’मुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत ६ लाखांची भर पडली असून सर्वाधिक प्रतिसाद कोल्हापूर विभागातून मिळत आहे. राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
१७ मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून महिलांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या दैनंदिन सरासरी १४ लाखपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर, एसटीची दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या ५५ लाख आहे. यातून एसटीला ४ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, कोल्हापूर विभागात १ महिन्यात तब्बल ३० लाख २४ हजार महिलांनी प्रवास केला.
महिला सन्मान योजने’मुळे अर्ध्या तिकिटात प्रवास करणे महिलांना शक्य झाले आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.