मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातील एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे  या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात ‘अ’ वर्गात पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान  राबविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान राबविणार येणार असून या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर होणार आहे. यानिमित्ताने राज्यभर प्रत्येक बस स्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>रुग्णांसाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बस स्थानक, तसेच निर्जंतुकीकरण, टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे. तसेच ‘आपलं गाव, आपलं बस स्थानक’ या संकल्पनेवर आधारित  लोकसहभागातून बस स्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य गाभा राहणार आहे. कोणतेही बस स्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्या अर्थाने बस स्थानक हे त्या गावची शान असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बस स्थानकाच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यंयीकरणासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

हेही वाचा >>>१७ अभ्यासक्रमासाठी मॉक टेस्ट, मॉक टेस्टसाठी भरावे लागणार ५०० रुपये

वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर ३ महिन्यांनी प्रत्येक बस स्थानकाचे मूल्यमापन करण्यात येईल. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बस स्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या सर्व बस स्थानकांचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी ‘अ ‘ वर्ग, निमशहरी ‘ब’ वर्ग व ग्रामीण ‘क’ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिल्या आलेल्या  बस स्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्यपातळीवर ‘अ’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बस स्थानकाला १ कोटी रुपये, ‘ब’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बस स्थानकाला ५० लाख रुपये, तर ‘क’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बस स्थानकाला २५ लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St will implement hindu hriday samrat balasaheb thackeray clean beautiful bus station campaign mumbai print news amy