मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. याचा थेट फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसला. गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या, ग्रामीण भागांत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले. राज्यातील २५१ आगारांपैकी ५९ आगारे पूर्णत: बंद झाल्याने एसटीची सेवा विस्कळीत झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे मंगळवारी प्रचंड मंदावली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात आगारातून बस सुटत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक भागांत वाडी-वस्त्यांना मुख्य शहराशी जोडणारी एसटीची सेवा ठप्प होती. सामान घेऊन गावी निघालेल्या कुटुंबांनाही खूप हाल सोसावे लागले. काही बस आगारांत कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

हेही वाचा >>>निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक

राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारल्याने ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २५१ आगारांपैकी ५९ आगार पूर्णत: बंद होते तर ७७ आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरू होती. ११५ आगारांमध्ये वाहतूक पूर्णत: सुरू होती. शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, वेतन वाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, मागील (पान १२ वर) (पान १ वरून) करारातील त्रुटी दूर कराव्यात, शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल करावा, वैद्याकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी एसटी महामंडळातील बहुतांश संघटनांनी स्थापन केलेल्या ‘संयुक्त कृती समिती’ने हे आंदोलन पुकारले आहे.

मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एसटी कामगार संघटनांची बैठक आज, बुधवारी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी दुपारी उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळात आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास संघटनेने नकार दिल्यामुळे बैठकीत तोडगा निघू शकला नाही. एसटी महामंडळानेही प्रवाशांची गैरसोय होईल, अशी कोणतीही कृती करू नये, असे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे.

हेही वाचा >>>सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मे २०२५ ची मुदत; कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

कुठे, कसा परिणाम?

मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत होती. ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णत: बंद होती. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू होती. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगारे बंद होती.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक सुरळीत होती. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णत: बंद होते. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस या आगारांत शंभर टक्के बंद होता. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर ही आगारेदेखील बंद होती.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ ही आगारे तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव येथे बंदला प्रतिसाद मिळाला. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होती.

रत्नागिरी विभागातील खेड, दापोली ही बसस्थानके बंद होती. जिल्ह्यात गुहागर, चिपळूण आगारे अंशत: बंद आणि रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुखमध्ये वाहतूक सुरळीत होती.

दृष्टिक्षेपात आंदोलन

● २२,३८९ नियोजित एसटी फेऱ्यांपैकी ११,९४३ फेऱ्या रद्द

● दिवसभरात ५० टक्के वाहतूक बंद

● एसटीचे अंदाजे १४-१५ कोटी रुपयांचे महसुली नुकसान

● ५९ आगारे पूर्णत: बंद

● ७७ आगारांमध्ये अंशत: वाहतूक

● ११५ आगारांमध्ये वाहतूक सुरळीत

सुमारे ६० ते ७० हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल.- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St workers joint action committee started agitation against government amy