एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाचा बांध (ST Workers Protest) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर फुटला. अचानक या ठिकाणी शेकडोच्या संख्येने आंदोलक एसटी कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी परावारांच्या घरावर चप्पला फेकल्या. यावेळी घरी असणाऱ्या पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या घराबाहेर आल्या.

नक्की वाचा >> पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी फेकल्या चप्पला; फडणवीस म्हणाले, “नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक आंदोलक त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं मांडायला जाऊ लागले. मात्र सुरु असणाऱ्या अभूतपूर्व गोंधळादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या आजबाजूला येणाऱ्या आंदोलकांना दूर ठेवण्यासाठी पोलीस वर सुरक्षा कर्मचारी प्रयत्न करत होते. मात्र एका क्षणी एका पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलक महिलेला मागे लोटलं असता सुप्रिया सुळेंनी त्या महिलेचा हात धरुन मी तुझ्याशी बोलते म्हणत त्या महिलेसहीत इतर महिलांना सुरक्षारक्षकांच्या कड्यापासून बाजूला नेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.

सुप्रिया सुळेचे सुरक्षारक्षक आणि पोलीस आंदोलकांना त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच एका पोलिसाने महिला आंदोलकाला मागे ढकललं. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी पुढे येत त्यांनी, “मी बोलायला तयार आहे तुझ्याशी,” म्हणत त्या माहिलेचा हात पकडला. सुप्रिया यांच्या या प्रतिसादामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेला रोखलं नाही. सुप्रिया यांनी या महिलेला बाजूला नेलं. त्यानंतर त्यांनी त्या महिलांपैकी एका मुलीला शांत करत, “इकडे ये बेटा, मी बोलायला तयार आहे,” म्हणत शांत होऊन बोला असं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे सुरु असणाऱ्या गोंधळामध्ये अनेकजण आरडाओरड करत होते. सुप्रिया यांनी हात जोडून या महिलांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. या महिला आक्रोश करत रडत आपलं म्हणणं मांडत होत्या. मात्र मागे आरडाओरड सुरु असल्याने पुढे संवाद होऊ शकला नाही.

दरम्यान, आंदोलक परतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.