मुंबईमधील पवई तलावामध्ये मगरींचा अधिवास असून मगरींनी हल्ला केल्यास स्वत:चा आणि इतरांचा बचाव करून परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची याबाबत पशु वैद्यकीय पथकामार्फत मुंबई महानगरपालिका आणि आयआयटी- मुंबईतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पवई तलावात आयआयटी मुंबई, रेनिसंस हॉटेल, पवई उद्यानाजवळ मोठ्या प्रमाणावर मगरींचा अधिवास असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच तलावातील छोटा उंचवटा आणि आसपासच्या परिसरात मगरींचे दर्शन घडते. ही बाब लक्षात घेऊन मगरींचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पशु वैद्यकीय पथकामार्फत प्रथमनच पवई तलावांतील मगरींची गणना केली होती. या गणनेअंती तलावामध्ये १८ प्रौढ मगरी असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा – ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…”
पवई तलावात मच्छीमार मासेमारी करीत असतात. तसेच पर्यटकांचाही तेथे वावर असतो. मच्छीमार आणि पर्यटकांवर मगरींनी हल्ला केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. असे प्रसंग टळावेत यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.मगरींच्या गणनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम अद्याप सुरू असून अंतिम अहवाल सादर झालेला नाही. पवई तलाव परिसरात येणारे स्थानिक रहिवासी, मच्छीमार, पर्यटकांना मगरीपासून धोका निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना करम्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पशु वैद्यकीय पथकामार्फत मुंबई महानगरपालिका आणि आयआयटी – मुंबईमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मगरीने हल्ला केल्यास कोणती उपाययोजना करायची, त्यांना नियंत्रणात कसे आणायचे, नागरिकांवर मगरीने हल्ला केल्यास काय करायचे आदींबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत मगरीचा अंतर्भाव आहे. पवई तलावातील मगरींचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली आहे.