मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितीली मुंबईमधील संक्रमण शिबिरातील संक्रमण शिबिरार्थींच्या २०२१ पासून रखडलेल्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला अखेर सोमवारपासून सुरुवात झाली. चेंबूरमधील सहकार नगर संक्रमण शिबिरापासून या बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी १९५ संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात दोन हजार संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे दुरुस्ती मंडळाचे नियोजन आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील मूळ रहिवाशांना मंडळाकडून म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येते. असे असताना मूळ भाडेकरुंच्या संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असून घुसखोरी रोखण्यात मंडळाला यश न आल्याने घुसखोरांचा प्रश्न मंडळासाठी डोकेदुखी बनला आहे. मूळ भाडेकरूंचा समावेश असलेल्या बृहतसूचीवरील घरे घुसखोरांकडून लाटण्याचेही प्रकरणे समोर आली आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने घुसखोरांकडून बांधकाम शुल्क आणि इतर शुल्क अदा करून घेत त्यांना अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. काही कारणाने या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. लवकरच ती होण्याची शक्यता आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने संक्रमण शिबिरार्थींचे वर्गीकरण करणे गरेजेचे आहे. त्यामुळे या वर्गीकरणासाठी मंडळाने बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे.

घुसखोरांना अधिकृत करण्याबरोबरच मंडळाने २०२१ मध्ये बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा निर्णय घेतला होता. यासाठी एका खासगी संस्थेची नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र २०२५ पर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण मार्गी लागले नव्हते. अखेर या सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. चेंबूर येथील सहकार नगरमधील संक्रमण शिबिरापासून या सर्वेक्षणास सुरुवात झाल्याची माहिती दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सहकार नगरमध्ये मंगळवारी (११ फेब्रुवारी) सर्वेक्षण सुरी राहील, तर गोरेगाव पूर्व येथील बिंबिसारनगरमध्ये १२ ते १७ फेब्रुवारीदरम्यान सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर संक्रमण शिबिरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

दरम्यान, म्हाडाने आपल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार संक्रमण शिबिरार्थींचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यात दोन हजार संक्रमण शिबिरार्थींचे सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढेही सर्वेक्षण सुरूच राहणार आहे. एकूण संक्रमण शिबिरार्थींची संख्या अंदाजे २० हजार असण्याची शक्यता आहे. त्यानुसार २० हजार संक्रमण शिबिरार्थींचे सर्वेक्षण होणार असून ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ असे संक्रमण शिबिरार्थींचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘अ’मध्ये मूळ भाडेकरू, ‘ब’मध्ये खरेदी-विक्री व्यवहार केलेले आणि ‘क’मध्ये घुसखोरांचा समावेश असणार आहे. २० हजार संक्रमण शिबिरार्थींच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाअंती वर्गवारीनुसार संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढे न्यायालय आणि राज्य सरकारच्या अंतिम निर्णयानुसार घुसखोरांविरोधातील कार्यवाही केली जाणार असल्याचेही दुरुस्ती मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.