लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मालाड मालवणी येथील मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राच्या पुनर्बांधणीचे गेल्या तीन- चार वर्षांपासून रखडलेले काम आता लवकरच सुरू होऊ शकणार आहे. काम रखडल्यामुळे व विविध कारणांमुळे आता या कामाचा खर्च वाढला आहे. मूळ ११ कोटींचा कामाचा खर्च आता तीन कोटींनी वाढून १४ कोटींवर गेला आहे.
मालाड मालवणी येथील गेट क्रमांक ७ जवळ पालिकेच्या आरोग्य केंद्राच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाच्यावतीने हे काम केले जात आहे. २०१८ मध्ये या कामासाठी कार्यादेश देण्यात आला होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये कामाला प्रत्यक्ष सुरूवातही झाली. मात्र मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू झाल्यामुळे हे काम बंद पडले. त्यामुळे कंत्राटदाराला फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. पण आता पालिका प्रशासनाने या कामाच्या खर्चात फेरफार करणारा प्रस्ताव आणला आहे. वास्तुविशारद विभागाच्या नव्या शिफारशी, अग्निशमन विभागाच्या सुधारित शिफारशी, राष्ट्रीय भवन संहितानुसारच्या सुधारित गरजा यामुळे या कामाचा खर्च वाढला असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
आणखी वाचा-आशुतोष गोवारीकर यांचे अभिनेता म्हणून पुनरागमन
मुंबई अग्निशमन दलाच्या शिफारशीनुसार प्रत्येक मजल्यावर जिन्याच्या ठिकाणी अग्निरोधक दरवाजे बसवण्यात येणार आहेत. आरोग्य केंद्रापासून ३० मीटर अंतरावर रस्त्यावर असलेल्या प्रवेशिकेपर्यंत गटाराचे काम केले जाणार आहे. प्रकल्पातील पूर्वीच्या स्ट्रक्चरल सल्लागाराची मुदत संपली असल्यामुळे नवीन सल्लागाराने सुधारित आरेखन दिले आहे, अशा कारणांमुळे हा खर्च वाढल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. सुरक्षा व दक्षतेच्या उद्देशाने सीसीटीव्ही, सौर उर्जा यंत्रणा बसवण्यात येणार असून एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत, असे विविध बदल नव्याने करण्यात आले आहेत. शस्त्रक्रियागृहाच्या रचनेतही बदल करण्यात आले आहेत. या सर्व कारणांमुळे हा खर्च वाढल्याचे आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाचे म्हणणे आहे. मूळ ११ कोटी २५ लाखांचा खर्च साडेतीन कोटींनी वाढला असून आता हा खर्च १४ कोटी ७२ लाखांवर गेला आहे.