अभिषेक तेली
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष आज शिंदे व ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा हा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडत आहे. त्यामुळे संपूर्ण दादर परिसरात मोठ्या प्रमाणात दसरा मेळाव्याची फलकबाजी आणि भगवे झेंडे व पताका लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रचार साहित्याची विक्री करणारे विविध स्टॉल्स हे दादर परिसरात थाटण्यात आले आहेत. राज्यातील विविध भागातून विक्रेते प्रचार साहित्याची विक्री करण्यासाठी दादरमध्ये दाखल झाले आहेत.
शिवसेनेच्या प्रचार साहित्यांच्या स्टॉल्सवर विक्रीसाठी भगवे शेले, टोपी, छोटे झेंडे, भगवे धागे, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा आणि प्रतिमा असलेले पेन, खिशाला लावायचा बिल्ला, गाडीला लावायचे बिल्ले, स्टिकर आणि झेंडे आदी विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रचार साहित्य घेण्यासाठी शिवसैनिकांची झुंबड उडत आहेत. काही ठिकाणी स्टॉल्स तर काही विक्रेते संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात फिरून या प्रचार साहित्याची विक्री करीत आहेत.
आणखी वाचा-मुंबई : शिवाजी पार्क दसरा मेळाव्यात कट्टर शिवसैनिकाच्या सजवलेल्या मोटरसायकलने सर्वांचे वेधले लक्ष
‘शिवसेनेच्या स्थापनेनंतर माझ्या वडिलांनी शिवसेनेच्या प्रचार साहित्याची विक्री करण्यास सुरुवात केली. मी गेल्या २० ते २५ वर्षांपासून दादरमध्ये येऊन शिवसेनेच्या प्रचार साहित्याची दसरा मेळाव्याच्या दिवशी विक्री करीत आहे’, असे रत्नागिरी येथून प्रचार साहित्याची विक्री करण्यासाठी आलेले संदीप पालकर यांनी सांगितले.