|| रसिका मुळ्ये
नव्वदीच्या दशकापर्यंत केवळ स्नेहसंमेलन आणि विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण प्रगट करण्याचे व्यासपीठ म्हणून आखले जाणारे महाविद्यालयांचे महोत्सव आता मात्र पुरते व्यावसायिक झाले आहेत. त्या काळातही दक्षिण मुंबईत असलेल्या हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या प्रतिष्ठित आणि उच्च आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांमधील महोत्सव डोळे दिपवून टाकणारे असत. झेव्हियर्सचा मल्हार, आयआयटीचा मूड इंडिगो यांच्या अतिशयोक्त चर्चा उपनगरांतील महाविद्यालयांमध्ये वर्षभर चालत. दोन हजारचे दशक सुरू झाल्यापासून मात्र सिनेमा, इव्हेण्ट मॅनेजमेण्ट कंपन्या, बडय़ा बडय़ा प्रायोजकांनी महाविद्यालयांचे महोत्सव व्यापून टाकले. मुंबईसोबत उपनगरांमधील साऱ्याच महाविद्यालयांमध्ये महोत्सवांच्या रांगा लागू लागल्या. गेल्या दोन दशकांत दरएक महाविद्यालयांत ‘आम्हीपण कमी नाही’ हे दाखवून देण्याच्या खुमखुमीतून महोत्सवांचा झगमगाट वाढतच चालला आहे, अन् त्यातून ज्या मूळ हेतूंसाठी हे महोत्सव राबविले जातात तो बाजूला पडत चालला आहे.
गेल्या आठवडय़ात मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयात महोत्सवादरम्यान गर्दी आटोक्यात न आणता आल्याने काही विद्यार्थी जखमी झाले. या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयांतील महोत्सवांची बेरंगी वाटचाल पुन्हा एकदा समोर आली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नसली, तरी यापुढे असल्या महोत्सवांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा उभारणे महाविद्यालयांना गरजेचे बनणार आहे.
आयुष्यातील सर्वाधिक बंडखोरीचे पर्व हे विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन काळात उतरलेले असते. त्यामुळे गर्दी खेचणाऱ्या कार्यक्रमांच्यावेळी जेवढी काळजी घेतली जाते त्यापेक्षा अधिकच काळजी महाविद्यालयांच्या महोत्सवादरम्यान घेणे आवश्यक आहे. पाश्चिमात्य देशांतील हायस्कूल समाप्तीच्या काळातील ‘प्रॉम नाईट’, ‘डीजे नाईट’ या संकल्पना आपल्याकडील महाविद्यालयांमध्येही रुजायला लागली आहे.
‘कॅलिडोस्कोप’, ‘उमंग’, ‘प्रतिबिंब’ आदी लक्षवेधी महोत्सवांखेरीज मुंबई आणि उपनगरांमधील शेकडो महाविद्यालयांमध्ये आपापले महोत्सव होत आहेत. प्रत्येक महोत्सवाचे स्वरूप दरवर्षी अधिकाधिक आकर्षक, थाटामाटाचे आणि गाजावाजा करणारे ठरत आहेत. पूर्वीच्या स्नेहसंमेलनातील विद्यार्थ्यांच्या कलाबाजीला अधिक उठावदार करण्यासाठी इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपन्या राबत आहेत आणि त्यात वेगवेगळ्या स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्यांची प्रायोजकत्व मिळत असल्यामुळे या महोत्सवांची आर्थिक उलाढालही नजरेत भरणारी झाली आहे.
विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्कातून भरविण्यात येणाऱ्या नव्वदीच्या दशकांतील स्नेहसंमेलनाची जागा आता कोटय़वधी खर्चून डीजे, आकर्षक रोषणाई, बलाढय़ शामियाना आणि सिनेमासारखे सेट्स उभारणाऱ्या फेस्टिवलमध्ये रूपांतरित झाली, तेव्हा ती बऱ्यापैकी महाविद्यालये आणि विद्यार्थी यांच्यापासून लांब जाऊ लागली. मस्ती, मजा, मौज यांची बरसात करणारे दोनदिवसीय-दहादिवसीय महोत्सव बाहेरील विद्यार्थ्यांना सशुल्क सहभागाची मुभा देण्यास सुरुवात करू लागले. त्यातून या महोत्सवांमध्ये वाढणाऱ्या गर्दीची नियोजन व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे बनले. काही महाविद्यालयांमध्ये या यंत्रणा अत्यंत कसोशीने पाळल्या जातात. मात्र बहुतांश महोत्सव हे इव्हेण्ट कंपन्या आणि प्रायोजकांच्या हाती गेल्यानंतर त्यांना या महोत्सवांना अधिकाधिक चर्चेत आणण्यासाठी विविध क्लृप्त्या आखाव्या लागल्या. त्यातूनच मग सिनेक्षेत्रातील तारे-तारकांची या महोत्सवांना उपस्थिती वाढू लागली. आघाडीचे अभिनेते, संगीतकार आणि गायक या महोत्सवांमध्ये सातत्याने दिसू लागल्यानंतर त्या महोत्सवाची चर्चा आणि ओळख आपोआप वाढू लागली.
स्नेहसंमेलन या संकल्पनेला मागास ठरवून ‘कॉलेज फेस्ट’ ही विद्यार्थ्यांना आत्यंतिक महत्त्वाची बाब वाटू लागली. काही महाविद्यालयांमध्ये पावसाळ्यात, तर काही महाविद्यालयांमध्ये हिवाळ्यात फेस्टिवलचा हंगाम सुरू होतो. यात अभिनय, वादन, गायन, नृत्य या टॅलेंट हंटच्या पारंपरिक बाजूसोबत फॅशन शो आणि अनेक नव्या गेम्सचा अंतर्भाव झाला आहे. यातील गमतीचा भाग हा की, एखाद्या बडय़ा महाविद्यालयाच्या फेस्टिवलमध्ये एखादा नवा खेळ गाजत असला, की त्याचे अंधानुकरण इतर महाविद्यालयांमधील महोत्सवांमध्ये होते.
विद्यार्थ्यांना या महोत्सवातील चकचकाट आणि त्यातून मिळणारा आनंद खुणावत राहतो. मात्र या महोत्सवांमध्ये गैरप्रकार घडल्यास वर्षभर महाविद्यालयाचे नाव पणाला लागते.
नामांकित गायक त्यांचे बॅण्ड्स आणि सिनेअभिनेत्यांचा कार्यक्रम जेव्हा एखाद्या महाविद्यालयात आयोजित केला जातो, तेव्हा त्या महाविद्यालयांच्या नजीक असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये त्याची बऱ्यापैकी चर्चा झालेली असते. मग महोत्सवाच्या प्रसंगी अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची केवळ कार्यक्रम आणि महोत्सव अनुभवण्यासाठी गर्दी होते. विद्यार्थी मौज-मजेत इतके मश्गूल असतात, की त्यांना आटोक्यात ठेवणे अवघड असते. यातून मुलींच्या छेडछाडीसोबत आपापल्या महाविद्यालयांच्या अस्मितेच्या मुद्दय़ांवरून हाणामारी असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.
महोत्सव दिवसा असल्यास त्यामध्ये अंमळ मर्यादा असलेल्या दिसतात. पण रात्रभर चालणाऱ्या महोत्सवांमध्ये मद्य आणि अमली पदार्थाचा वापर होत असल्याच्या चर्चाही सातत्याने होत असतात.
महोत्सवांच्या यशस्वीतेमुळे महाविद्यालयांचे होणारे नाव, प्रायोजकांमुळे यातून मिळणारा अतिरिक्त नफा आणि खदखदत्या तरुणाईच्या हौसेला उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ असा तिहेरी हेतू कॉलेजकडून साध्य होत असले, तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाजूने अधिक सतर्क राहणे या आवश्यक आहे, याचा विसर अनेकदा महाविद्यालयांनाही पडतो.
मिठीबाई महाविद्यालयाच्या महोत्सवात चेंगराचेंगरी
महोत्सव ही महाविद्यालयाची शान बनली असेल तर प्रत्येक महाविद्यालयाने त्याला कसोशीने शिस्तही लावायला हवी. एखादी प्राणघातक आणि भीषण दुर्घटना घडून या नव्याने उफाळेल्या महोत्सव संस्कृतीवर बडगा येण्याआधी महाविद्यालय आणि त्यांतील सजग विद्यार्थ्यांनी लवकरच पावले उचलायला हवीत. मौज-मजेची अविरत सुरू असलेली ही महाविद्यालयांची नवपरंपरा अधिक सुरक्षित राहिली, तर कुणालाच आक्षेप असायचे कारण नाही.