शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी झालेल्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना न दाखविताच कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट केल्याचा मुद्दा उपस्थित करीत पालिका चिटणीस नारायण पठाडे यांनी महिला उपचिटणीसावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. अंत्यसंस्कारांच्या वेळी झालेल्या खर्चाच्या मुद्दय़ावरून गेले तीन दिवस सुरू असलेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर आता कनिष्ठ महिला अधिकाऱ्याला गोवण्याच्या या निर्णयामुळे प्रशासनाच्या नथीतून तीर मारण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.  
प्रशासनाचा हा प्रस्ताव या उपचिटणीसाने स्थायी समितीच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केला होता. मात्र त्यापूर्वी त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली नाही. या कार्यक्रम पत्रिकेची माहिती प्रसारमाध्यमांना मिळाल्याने पुढील रामायण घडले. याच रागातून त्यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्याची प्रतिक्रिया पालिका वतुर्ळात व्यक्त केली जात आहे.
पाच लाख रुपयांच्या खर्चाच्या या प्रस्तावास शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. या खर्चाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने गुरुवारी पाच लाख रुपयांचा धनादेश अतिरिक्त आयुक्तांकडे सुपूर्द केला होता. मात्र या धनादेशाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रस्तावास स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली.
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारांसाठी शिवाजी पार्कमध्ये होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन पोलिसांबरोबरच्या चर्चेनंतर पालिकेने मैदानात सीसी टीव्ही कॅमेरे, एलईडी बसविले होते. त्यावरील खर्चापोटीचे पाच लाख रुपये पालिकेने संबंधित ठेकेदाराला दिले. या खर्चाला कार्योत्तर मंजुरी घेण्यासाठी प्रशासनाने स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला होता. ‘शिवसेनेला पाच लाख रुपये जड झाले का’ असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने पाच लाख रुपयांचा धनादेश पालिकेला पाठवून दिला. खासदार अनिल देसाई यांनी अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. या धनादेशाबाबत अद्याप प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा