पालिका रुग्णालयांतील औषधांचे विक्रेते मनमानी कारभार करीत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी उद्दामपणाने वागत आहेत. त्यामुळे केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांतील औषध विक्रेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी दस्तुरखुद्द स्थायी समिती अध्यक्षांनीच केली आहे. रुग्णांना झटपट औषधे मिळावीत या उद्देशाने पालिकेने केईएम, शीव आणि नायर रुग्णालयात औषधांची दुकाने सुरू करण्यात आली असून ठेकेदारी पद्धतीने ही दुकाने चालविण्यात येत आहेत. मात्र डॉक्टरांशी संगनमत करून हे औषध विक्रेते रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळत आहेत, असा आरोप स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केला आहे.
केईएम रुग्णालयातील औषध विक्रेत्याबद्दल रुग्णांच्या अनेक नातेवाईकांनी तक्रार केल्या आहेत. राजकीय पक्षांशी लागेबांदे असलेले हे विक्रेते प्रशासनालाही जुमानत नाहीत. या औषध विक्रेत्यांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.
रुग्णालयात औषध विक्रीच्या दुकानासाठी निविदा मागविताना यापुढे ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेच्या सूचनांचा विचार करावा. त्यामुळे औषधांवर सुमारे ५६ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा