आगामी निवडणुकांचा मागोवा घेत नागरी कामांचा सपाटा लावून मतदारांना आकर्षित करता यावे यासाठी नगरसेवकांना जाद निधी मिळवून देण्यात मश्गुल असलेले राहुल शेवाळे स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल दोन तास विलंबाने पोहोचले. परिणामी अर्थसंकल्पावरील चर्चेची बैठक दोन तास विलंबाने  सुरू होताच ताटकळत बसलेले विरोधी सदस्य सत्ताधाऱ्यांच्या नावाने लाखोली वाहात सभागृहातून बाहेर पडले. अखेर सत्ताधाऱ्यांनाही ही बैठक आवरती घ्यावी लागली.
महापालिकेच्या २०१३-१४ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक दुपारी ३ वाजता सुरू होणार होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सर्व सदस्य बैठकीसाठी वेळेवर उपस्थित झाले. मात्र दस्तुरखुद्द स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे सभागृहात अनुपस्थित होते. घडय़ाळाचे काटे पुढे सरकत होते. तसतशी सभागृहातील अस्वस्थता वाढत होती. अखेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राहुल शेवाळे सभागृहात हजर झाले आणि त्यांनी बैठकीचे कामकाज सुरू केले. मात्र ताटकळलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. केवळ शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांचे एकमेव भाषण झाले आणि विरोधक नसल्यामुळे बैठक आवरती घेण्यातआली. या बैठकीमध्ये आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येणार होती. परंतु त्यासाठी आता २७ फेब्रुवारी रोजी पुन्हा स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.