गेल्या महिन्याभरापासून कराराचे नूतनीकरण आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची परवानगी यांच्या कचाटय़ात अडकलेल्या ‘हेलिकॉप्टर राइड’ सेवेला १ नोव्हेंबरपासून नव्याने सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपत्तिमानाप्रमाणे सर्वसामान्य मुंबईकरांनाही मायानगरी मुंबईचे १ हजार फुटावरून हेलिकॉप्टरमधून दर्शन घेता येणार आहे. गेल्या एप्रिल महिन्यांत इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) आणि यज्ञ एव्हिएशन यांच्यात एक करार करण्यात आला होता. त्यानुसार मुंबईत १ मेपासून हेलिकॉप्टरद्वारे मुंबईदर्शन सेवा सुरू करण्यात आली. मात्र सप्टेंबर महिन्यात या कराराची मुदत संपल्याने हेलिकॉप्टरद्वारे मुंबईदर्शन ही सेवा बंद करण्यात आली होती. आता मात्र महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही कंपनींमध्ये नव्याने करार झाला असून १ नोव्हेंबरपासून ही सेवा मुबंईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे आयआरसीटीसीचे अधिकारी हर्ष अग्रवाल यांनी सांगितले. काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता केली जात असल्याने ही सेवा १ नोव्हेंबरला सुरू होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईचे हवाई दर्शन श्रीमंतांप्रमाणे सर्वसामान्य मुंबईकरांनाही घेता यावे यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या हवाई दर्शनासाठी दोन प्रकारचे हेलिकॉप्टर उपलब्ध असून छोटय़ा हेलिकॉप्टरमध्ये तीन तर मोठय़ा हेलिकॉप्टरमध्ये सहा व्यक्ती बसण्याची क्षमता आहे. एका जॉयराइडसाठी प्रत्येकी ५५८० रुपये शुल्क आकारले जाते. १५ मिनिटांच्या या हवाई यात्रेसाठी दक्षिण मुंबई व उपनगरे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. दक्षिण मुंबईच्या हवाई दर्शनात वांद्रा-वरळी सी िलक, हाजी अली आणि जुहू असा परिसर पाहता येणार आहे. ही सेवा मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत उपलब्ध असणार आहे.तर उत्तर मुंबईसाठी ही सेवा सोमवार आणि शनिवार सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० या कालावधीत असणार आहे. या हवाई यात्रेत मालाड, गोराई आणि वर्सोवा हा परिसर पाहता येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. देशात असे हवाई पर्यटन घडवणारे महाराष्ट्र  हे पहिले राज्य असून या सेवेला मुंबईकारांचा भरघोस प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा