मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने तयारीला लगेचच सुरुवात करू या, असा निर्धार इंडिया आघाडी नेत्यांच्या अनौपचारिक चर्चेत गुरुवारी रात्री करण्यात आला. सरकारने १८ सप्टेंबरपासून संसदेचे अधिवेशन बोलाविल्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे की लवकर निवडणुका घेण्याची योजना आहे यावर खल करण्यात आला.
इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीला सायंकाळी प्रारंभ झाला. २८ पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पहिली अनौपचारिक बैठक पार पडली.
इंडिया आघाडीची बैठक सुरू होत असतानाच सरकारच्या वतीने १८ सप्टेंबरपासून पाच दिवसांचे संसदेचे अधिवेशन आयोजित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचे पडसाद बैठकीत उमटले. विरोधकांच्या बैठकीपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असावा, असा एक सूर होता. तर लोकसभेच्या निवडणुका लवकर घेण्याची मोदी यांची योजना असावी, अशीही चर्चा झाली. मोदी धक्कातंत्राचा अवलंब करू शकतात, असाच नेत्यांचा सूर होता.
हेही वाचा >>> इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ओमर अब्दुल्ला यांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले…
२८ पक्षांचे नेते कोणताही अहंकार न ठेवता एकत्र आले हेच मुंबई बैठकीचे यश असल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने मत व्यक्त केले. पाटणा किंवा बंगळुरू बैठकांच्या वेळी सर्व पक्षांच्या उपस्थितीबाबत काहीसे संभ्रमाचे वातावरण होते. भाजपला पराभूत करण्याकरिता सर्व पक्षांनी अहंकार दूर ठेवावा, असा सल्ला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बैठकीत दिला आहे.
आजच्या बैठकीची कार्यक्रमपत्रिका
शुक्रवारी सकाळी १० वाजता बैठकीला प्रारंभ होईल. त्यानंतर इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण (सर्व नेत्यांमध्ये सहमती झाल्यास) केले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष बैठक सुरू होईल. दुपारी २ ते ३ पर्यंत ही बैठक चालेल. यात आगामी निवडणुकीतीर रणनीती, जागावाटपाचे सूत्र, समन्वय समिती, समन्वयक नेमायचा का, आदी विविध मुद्दय़ांवर चर्चा केली जाईल. बैठक संपल्यावर दुपारी ३.३० वाजता सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर इंडिया आघाडीची तिसरी बैठक संपेल. आगामी बैठक चेन्नईत घेण्याची सूचना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली आहे.
समन्वय समिती आज
इंडिया आघाडीची चर्चा बरीच झाली. आता पुढील पावले टाकावीत यावर सर्वच नेत्यांमध्ये सहमती झाली. उद्या होणाऱ्या औपचारिक बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समन्वय समितीत सर्व पक्षांना स्थान मिळणार नाही याची जाणीव शरद पवार यांनी करून दिली. राज्य पातळीवर समन्वय समित्या स्थापन करण्यात याव्यात, असा प्रस्ताव काही नेत्यांनी मांडला. जागावाटपावर मुंबईच्या बैठकीत चर्चा होणार नाही. पण जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाईल. तसेच राज्य पातळीवर जागावाटप करण्यात यावे की कसे यावर उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाईल.
‘इंडिया’ पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू शकत नाही – फडणवीस
मुंबई : विरोधकांच्या ‘ इंडिया आघाडी ’ ला मोदी हटाव खेरीज दुसरा कोणताही विकास कार्यक्रम नाही. आघाडीतील पाच पक्षांनी पंतप्रधानपदावर दावा ठोकला असून ते आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत. केवळ घोषणा आणि फलकबाजी करून ते टाइमपास करीत आहेत. या आघाडीचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. विरोधकांच्या आघाडीतील पक्ष देशाचा विचार करण्यासाठी नव्हे, तर आपली राजकारणातील दुकाने वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कर्तृत्व, नेतृत्व व कार्यामुळे देशाला विकास व प्रगतीच्या मार्गावर नेले. देशासाठी सर्वस्व अर्पण करून गरीब कल्याणाचा कार्यक्रम राबविला. मोदी यांना सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान आहे.
त्यामुळे ३६ नाही, तर १०० पक्ष जरी एकत्र आले, तरी ते जनतेच्या मनातून मोदींना हटवू शकत नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> VIDEO: चीनच्या च्यांग चुंग लिंगचा उल्लेख करत राहुल गांधींचा गंभीर आरोप; म्हणाले, “अदाणींच्या कंपनीत…”
डरपोकांचा पोरखेळ सुरू-शेलार
स्वत:चे कुटुंब वाचवायला एकत्र आलेल्या घमेंडखोर व डरपोक अशा २८ पक्षांचा पोरखेळ सुरू असून मुंबईकरांच्या वतीने आम्ही ‘ चले जाव ’ चा इशारा देत असल्याचा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आमदार आशीष शेलार यांनी दिला आहे. ज्यांनी आयुष्यभर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला, स्वा. सावरकरांचा वारंवार अपमान केला, त्या नेत्यांना एकत्र करून त्यांच्या पत्रावळी उचलण्याचे काम शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे सहकारी करीत आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आरोप करणारे ठाकरे व अन्य नेते मूर्खाच्या नंदनवनात असल्याची टीकाही शेलार यांनी केली.
‘विरोधकांच्या आघाडीत नावीन्य नाही’
नवी दिल्ली: ‘काँग्रेसचे क्षेपणास्त्र कधीही आकाशात झेप घेऊ शकणार नाही कारण, या क्षेपणास्त्रामध्ये इंधनच शिल्लक उरलेले नाही’, अशी उपहासात्मक टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया’ची महाआघाडी अहंकारी आणि भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती. हा धागा उचलत संबित पात्रा यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ‘घमेंडी गठबंधन’ असा उल्लेख करत पात्रा यांनी ‘इंडिया’तील घटक पक्षांनी २० लाख कोटींचा घपला केला असून हे नेते फक्त नफेखोरीचे धोरण राबवत असल्याचा आरोप केला. अशा भाजपविरोधी आघाडय़ांमध्ये नावीन्य उरलेले नाही अशी टीका संबित पात्रा यांनी केली.