मुंबई: ग्राहकांनी बँकेत गहाण ठेवलेले तीन कोटी रुपये किंमतीचे सोने बँक कर्मचाऱ्यानेच लुटल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप येथे घडल्याचे उघडकीस आले. याबाबत भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भांडुप पश्चिम येथील शाखेत हा प्रकार घडला. अनेक ग्राहकांनी विविध कारणासाठी या बँकेत सोने गहाण ठेवले होते. मात्र बँकेच्या तिजोरीची जबाबदारी असलेल्या मनोज म्हस्के या कर्मचाऱ्याने यापैकी तीन कोटी रुपये किंमतीचे सोने लुटले. मनोज म्हस्के याच्यावर बँकेतील तिजोरीची जवाबदारी होती. त्यामुळे त्याच्याकडे बँकेतील तिजोरीच्या चाव्या होत्या.
हेही वाचा : तळोजा गृहप्रकल्प प्रकरणात विकासक ललित टेकचंदानींविरोधात गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
काही दिवसांपूर्वी मनोज म्हस्के सुट्टीवर गेला होता. त्यामुळे त्याच्या सुट्टीच्या काळात बँकेच्या चाव्या इतर कर्मचाऱ्याकडे होत्या. या कर्मचाऱ्याने तिजोरी उघडून पाहिली असता, त्यात केवळ चार सीलबंद पाकिटे होते. बँकेतील रजिस्टरनुसार बँकेत एकूण ६३ सीलबंद पाकिटे होती. मात्र केवळ चारच पाकीट तिजोरीत आढळल्याने कर्मचाऱ्याने ही बाब वरिष्ठांना सांगितली. त्यांनी तत्काळ म्हस्केकडे विचारणा केली असता, आपणच हे सोने स्वतःच्या फायद्यासाठी इतर ठिकाणी ठेवल्याची त्याने सांगितले. त्यानुसार बँकेने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी म्हस्केसह त्याच्या एका साथीदाराला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.