महाराष्ट्र गौण खनिज नियम २०१३ राज्यात लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे नियम २४ ऑक्टोबर २०१३ पासून लागू होणार असून, तशी अधिसूचना काढण्यात येणार आहे. यामुळे राज्यात घरबांधणी व अन्य कामांसाठी आवश्यक असलेली गौण खनिजे विशिष्ट नियमानुसार मर्यादित प्रमाणात उत्खनन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
या निर्णयामुळे गौण खनिजाचे सुनियोजित व शास्त्रीय पध्दतीने उत्खनन होणार असून, त्यातून, पर्यावरण संतुलन राखले जाणार आहे. त्याबरोबरच विकास प्रक्रियेसाठी निरंतर गौण खनिजाची उपलब्धताही होणार आहे. या नियमांमध्ये विशिष्ट कालावधी व विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट परिमाणाइतके गौण खनिजाचे उत्खनन करण्यास परवानगी देण्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अशा परवानग्या देताना, राज्यात ज्यांची उपजीविका परंपरागत पद्धतीने गौण खनिजावर अवलंबून आहे, अशा व्यावसायिक जाती-जमातीचाही विचार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या खाण आणि खनिजे अधिनियम १९५७ अन्वये राज्यास गौण खनिजाबाबत नियम करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.