मुंबई : एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. कर्नाटकनंतर ही सेवा सुरू करणारे महाराष्ट्र दुसरे राज्य आहे.

परिवहन विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीने शिक्कामोर्तब करण्यात आले. सेवेचे दर अद्याप निश्चित झाले नसले तरी पण ते रिक्षा, टॅक्सीपेक्षा तीन पट कमी असतील असे संकेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. यामुळे प्रदूषणावर नियंत्रण आणि वीस हजार तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल, असे ते म्हणाले. येत्या दोन महिन्यांत सेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

मोठ्या शहरांत वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरली असताना कर्नाटक सरकारने चार वर्षांपूर्वी बाइक टॅक्सी सेवेचा पर्याय शोधला. आता राज्यातही या सेवेची नियमावली तयार केली जाणार असून वाहतूकतज्ज्ञ रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे.

बेरोजगारांसाठी अनुदान

५० ई-बाइक विकत घेणाऱ्या संस्था, कंपनीला या सेवेचा परवाना दिला जाणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या रिक्षा-टॅक्सी महामंडळातील सदस्यांच्या बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपये अनुदान दिले जाईल. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील हा व्यवसाय करून आपला शैक्षणिक खर्च भागवू शकतील. महिलांसाठी महिलाचालक असेल याची दक्षता घेतली जाणार आहे.