मुंबई : शिक्षणशास्त्राअंतर्गत येणाऱ्या बी.एड (सामान्य व विशेष), बीएड इलेक्टेड, बीएड-एमएड, एमएड या अभ्यासक्रमांना तर शारीरिक शिक्षणशास्त्राअंतर्गत येणाऱ्या बी.पी.एड, एम.पी.एड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जामध्ये बदल करण्याची संधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ३ ते ५ मार्चदरम्यान आपल्या अर्जाच्या तपशीलात दुरुस्ती करता येणार आहे. त्याचबरोबर अर्धवट असलेले अर्ज किंवा शुल्क भरणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांनाही या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बी.एड (सामान्य व विशेष), बीएड इलेक्टेड, बीएड-एमएड, एमएड आणि बी.पी.एड, एम.पी.एड या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा मार्चमध्ये होणार आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया २८ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात आली होती. मात्र अर्ज भरताना अनेक उमेदवारांकडून विविध प्रकारच्या किरकोळ चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करता याव्यात यासाठी संधी देण्याची विनंती अनेक विद्यार्थी व पालकांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे ईमेल द्वारे किंवा प्रत्यक्ष कार्यालयाला भेट देऊन केली होती. त्यानुसार विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या विनंतीची दखल घेऊन त्यांना अर्जातील तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार बी.एड (सामान्य व विशेष), बीएड इलेक्टेड, बीएड-एमएड, एमएड आणि बी.पी.एड, एम.पी.एड या अभ्यासक्रमांचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जातील वैयक्तिक माहितीत काही चुका असतील तर त्या सुधारता येतील.
अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु त्यांचा अर्ज २८ फेब्रुवारीपर्यंत अपूर्ण राहिला आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आणि परीक्षा नोंदणी शुल्क भरण्यासाठीही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्जातील तपशीलात बदल करण्यासाठी आणि अर्ज पूर्ण करून शुल्क भरण्यासाठी या विद्यार्थ्यांना ३ ते ५ मार्चदरम्यान संधी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे अर्जामध्ये बदल करता येणार आहे. तसेच २८ फेब्रुवारीनंतर नोंदणी लिंक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला नव्याने अर्ज नोंदणी करता येणार नसल्याचेही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.