मराठा सर्वेक्षण आणि त्यापाठोपाठ आता निवडणुकीच्या कामामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामात अधिक गुंतवले जात असल्याची ओरड होत होती. यावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडत शिक्षकांच्या बाजूने आवाज उचलला होता. “शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी जुंपू नका. निवडणूक आयोगाने त्यांच्या कामासाठी पर्यायी यंत्रणा उभारावी. शिक्षक त्या कामांवर गेले नाही आणि त्यांच्यावर जर शिस्तभंगाची कारवाई केली गेली, तर त्याकडे आम्ही बघून घेऊ”, असा इशाराच राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला होता.
त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीलएओ ड्युटीतून वगळून इतर कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटी देण्याबाबतचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पत्र अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “शालेय शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हा मुद्दा चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मीडियासमोर मांडला होता. राजसाहेबांच्या आदेशानुसार दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेऊन “कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये” अशी भूमिका आग्रहपूर्वक मांडली आणि केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था उभारताना माजी शासकीय कर्मचारी आदींनाही सामावून घ्यावे, अशी सूचना केली होती.”
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आग्रहामुळे काल रात्री उशिरा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी “मुंबईचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी अधिगृहीत करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा”, असा आदेश दिला आहे.
इच्छुक सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना BLO ड्यूटी देण्याबाबतचा पर्याय वापरण्यात यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, “शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस निवडणुकीशी संबंधित कामावर नियुक्त केल्यास त्यांना त्यांच्या शैक्षणिक कामाच्या दिवशी व वेळेस निवडणुकीचे काम दिले जाणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात यावी” असंही या आदेशात नमूद करण्यात आलं असल्याचे अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घ्या – सत्यजित तांबे
मनसेच्या मागणीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनीही हा विषय उचलून धरला आहे. फक्त मुंबईच नाही तर संबंध महाराष्ट्रासाठी हा निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु हा प्रश्न फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्व शिक्षकांना निवडणूक व अन्य शाळाबाह्य कामांमधून वगळण्यात यावे, अशी विनंती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे.