मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाने वीजदर कमी केल्याने आणि त्यासाठी वेगळे अंकगणित मांडल्याने पुढील पाच वर्षांत महसूल किती व कसा मिळेल, याची चिंता महावितरणला लागली आहे. कमाल वीज मागणी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत स्मार्टमीटर (टीओडी) धारक वाणिज्यिक व औद्याोगिक ग्राहकांना २० टक्के अधिक दराच्या तरतुदीमुळे स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेत अडचणी येण्याची चिन्हे आहेत.
महावितरणला येत असलेली तूट भरून काढण्याच्या दृष्टीने वीजदर निश्चितीची मागणी महावितरणने केली होती. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसह अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांमधून स्वस्त वीज उपलब्ध होईल व वीजदर कमी होतील, असे महावितरणचे गृहीतक होते. पण यंदाच्या वर्षीपासूनच राज्य वीज नियामक आयोगाने घरगुती, औद्याोगिक, वाणिज्यिक ग्राहकांचे वीजदर कमी केल्याने महावितरणला पुढील पाच वर्षे महसुलाचा प्रश्न भेडसावणार आहे. यासंदर्भात महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना म्हणाले, ‘‘महावितरणने सुमारे ४८ हजार कोटी रुपये तुटीचा प्रस्ताव सादर केला होता. पण आयोगाने हिशोब करून सुनारे ४४ हजार कोटी महसुली आधिक्य दाखविले आहे. या सुमारे ९२ हजार कोटी रुपयांचे अर्थगणित पुढील पाच वर्षांत कसे जमणार, हे बघणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीतून स्वस्त सौर वीज पुढील वर्षीपासून उपलब्ध होईल, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, या गृहीतकावर महावितरणने वीजदर स्वस्त होतील, असा अंदाज मांडला होता. मात्र आयोगाने घरगुती, औद्याोगिक व वाणिज्यिक ग्राहकांचे वीजदर कमी केल्याचे स्वागतच आहे.’’
अदानी वीज कंपनी
अदानी वीज कंपनीने ९६७९३ कोटी रुपये खर्चासाठी प्रस्ताव सादर केला होता, त्याऐवजी ८३९५८ कोटी रुपये खर्चास आयोगाने मंजुरी दिली. अदानी कंपनीचा वीजपुरवठ्याचा सध्याचा प्रति युनिट सरासरी दर १०.०६ रुपयांवरून पुढील पाच वर्षांत ७.७९, ७.२४, ७.०८,७.५ व ७.५१ इतका कमी होईल.
वीज वापर सध्याचे दर नवीन दर
०-१०० ६.४० ६.३८
१०१-३०० ९.१० ९.६३
३०१-५०० ११.१० ११.०३
५००+ १२.४० ११.९८
(सर्व दर रुपयांमध्ये)
टाटा वीज कंपनी
टाटा वीज कंपनीने ४९६० कोटी रुपयांचा वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केला होता, त्यापैकी ४५९१ कोटी रुपये आयोगाने मंजूर केले. सरासरी वीजपुरवठ्याचा दर १८ टक्क्यांनी यंदा कमी होत असून तो प्रति युनिट ७.५६ रुपये इतका असेल व पाच वर्षात तो ६.६३ इतका कमी होईल.
वीज वापर सध्याचे दर नवीन दर
०-१०० ५.३३ ४.७६
१०१-३०० ८.५१ ४.७६
३०१-५०० १४.७७ १३.५५
५००+ १५.७७ १४.५५
(सर्व दर रुपयांमध्ये)
बेस्टचे दर
बेस्टच्या ४३९४ कोटी रुपयांच्या दरवाढीच्या प्रस्तावापैकी ४४७४कोटी रुपये वाढ आयोगाने मंजूर केली आहे. मेट्रो, रेल्वे, मोनोरेल आदी मोठा वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना वहन आकार आकारला जाणार नाही.
वीज वापर सध्याचे दर नवीन दर
०-१०० ३.८४ ३.८४
१०१-३०० ७.४३ ७.४३
३०१-५०० ११.५३ ११.९१
५००+ १३.७० १४.११
(सर्व दर रुपयांमध्ये)
महावितरणचे वीजदर (घरगुती ग्राहक) :
स्थिर आकार : १३०-४३० रुपये
वहन आकार : प्रति युनिट १.२४ रुपये सर्व ग्राहकांसाठी
वीज वापर सध्याचे दर नवीन दर
०-१०० ४.७१ ४.४३
१०१-३०० १०.२९ ९.६४
३०१-५०० १४.५५ १२.८३
५००+ १६.७४ १४.३३
(सर्व दर रुपयांमध्ये)
कमाल वीजमागणी कमी करण्याचे प्रयत्न
सायंकाळी पाच ते रात्री दहा या कमाल वीजमागणीच्या काळातील मागणी कमी करण्यासाठी स्मार्टमीटरधारक औद्याोगिक व वाणिज्यिक ग्राहकांना २० टक्के जादा आकार द्यावा लागेल. मात्र त्यांना रात्री बारा ते सकाळी सहा आणि सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दहा ते ३० टक्के इतकी सवलत दिली जाणार आहे. मात्र ही सवलत देताना दुसऱ्या बाजूने सायंकाळच्या वीजवापरासाठी अधिक आकार असल्याने स्मार्ट मीटर बसविण्यास लहान व्यापारी, आस्थापनांचा विरोध होण्याची शक्यता आहे. सायंकाळची वीजमागणी अन्य वेळेत स्थलांतरित करण्यास प्रोत्साहनाच्या दृष्टीने आयोगाने या तरतुदी केल्या आहेत.
अदानींच्या ग्राहकांना लाभ
राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या यावर्षीच्या १० टक्के आणि पुढील वर्षीच्या ११.७ टक्के वीज दरकपातीमुळे अदानी वीज कंपनीच्या ३४ लाख ग्राहकांना मोठा फायदा होईल. स्थिर शुल्कात वाढ झालेली नाही. हरित वीज दर प्रीमियम २५ पैसे प्रति युनिट एवढा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता स्वच्छ ऊर्जा कोणालाही मिळू शकेल. सुलभ केलेल्या दररचनेनुसार विजेवर चालणारी वाहने वापरणाऱ्या ग्राहकांना मुंबईचा सर्वात कमी दर म्हणजे पाच रुपये ४८ पैसे प्रति युनिट हा कायम राहील. दिवसाच्या विशिष्ट वेळेवरील वीज वापरावर मिळणारी, वाढीव टीओडी सवलत आणि वापरानुसार मिळणारी विशेष सूट यामुळे देखील ग्राहकांना लाभ होईल, असे अदानी कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.