मुंबईत वांद्रे रेल्वे टर्मिनसवर अॅसीड हल्ल्यात मृत्यू झालेल्या प्रीती राठी या तरुणीच्या कुटूंबीयांना राज्य सरकारने दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. नौदलाच्या रुग्णालयात रुग्णसेविकेच्या पदावर रुजू होण्यासाठी प्रीती राठी  कुटूंबासमवेत मुंबईत वांद्रे टर्मिनसवर दाखल होताच एका अज्ञाताने प्रीतीवर अॅसीड फेकले होते. यात ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या अन्ननलिकेत अॅसीडचे थेंब गेल्याने श्वसननलिका आणि अन्ननलिकेस जोडणाऱ्या भागात सातत्याने रक्तस्त्राव होऊन ते फुफ्फुसात साचत होते. पांढऱ्यापेशी कमी झाल्याने प्रतिकारशक्ती कमी झालेल्या प्रीतीला रोज रक्त चढवावे लागत होते. त्यामुळे तिचा शनिवारी मृत्यू झाला. प्रीतीच्या कुटूंबीयांनी दोषींना कडक शासन होण्याची मागणी केली आहे. याप्रकरणाची दखल घेत राज्यसरकारने प्रीतीच्या कुटूंबीयांना दोन लाखाची मदत जाहीर केली आहे.