मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांसाठी विशेष विमानाची सोय केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिल्यावर गेल्या २ दिवसांत आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने ‘इंडिगो’ आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून १८४ पर्यटक मुंबईत दाखल झाले. दरम्यान, आणखी २३२ प्रवाशांसाठी उद्या, शुक्रवारी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मीरला जाण्यास सांगितले होते. महाजन यांच्याकडून फडणवीस यांनी गुरुवारी परिस्थितीचा आढावा घेतला. आणखी विमाने करायची असतील, तर करण्यास हरकत नसून त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले. महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली. तेव्हा फडणवीस यांनी पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणाऱ्या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: श्रीनगर जाऊन पर्यटकांना भेटले. त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणले. तसेच, गुरुवारीही महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. एअर इंडियाच्या विमानाने राज्यातील १०० पर्यटकांना मुंबई विमानतळावर आणले. तर, इंडिगोच्या विमानाने ८३ पर्यटकांना आणण्यात आले.
शिंदे यांची मदत की प्रसिद्धी?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर येथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी विशेष विमानाने गेले खरे, पण त्याची प्रसिद्धी एवढी सुरू झाली की मदतीसाठी गेले की प्रसिद्धीसाठी अशी चर्चा सुरू झाली.
राज्य सरकारकडून जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्यांना परत आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, आपत्तीकाळात मदतीचा हात देण्यात नेहमीच आघाडीवर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विशेष विमानाने काश्मीर गाठले. शिंदे यांच्या विमानतळावरील ‘टेक ऑफ’पासून ते ‘लॅण्डींग’पर्यंत सर्वकाही ‘लाईव्ह’ दाखविले जात होते.
सुटकेचा नि:श्वास…
● दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले. बऱ्याच पर्यटकांनी घाबरून स्वत:ला हॉटेलमध्ये बंद करून घेतले. तर, काहींनी राज्यात येण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. यावेळी राज्य सरकारद्वारे विशेष विमानाची सुविधा केल्यानंतर, पर्यटक श्रीनगर विमानतळावर दाखल होऊन, मुंबई विमानतळावर आले. या वेळी त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
● हल्ल्यानंतर प्रचंड घाबरलो होतो. घरी जायचे कसे, असा प्रश्न पडला होता. संबंधित प्रशासनाच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या विमान सेवेमुळे मुंबईत दाखल झालो. आता मोठ्या संकटातून वाचल्याने, आनंद होत आहे, असे एका पर्यटकाने सांगितले.
त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित
● महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विनंतीनुसार काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे १४ पर्यटक येथे थांबले होते.
● काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूहून दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. काश्मिरमधून शुक्रवारी येणार्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर शनिवारीही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.
एसटीची विशेष बस सुविधा
काश्मीर येथे अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक श्रीनगरहून विशेष विमानाने मुंबईला रात्रीच्या सुमारास येणार होते. या सर्व पर्यटकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटीच्या ‘शिवनेरी’ बस सज्ज ठेवल्या होत्या. पहिल्या विमानामध्ये १४६ व दुसऱ्या विमानात १७७ पर्यटक होते. त्यांच्यासाठी ८ शिवनेरी बस तयार ठेवण्यात आल्या होत्या.
काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटक अडकले आहेत. मी सुद्धा कुटुंबीयांबरोबर अडकलो होतो. तेथील संपूर्ण वातावरण खूप भीतीदायक झाले होते. प्रत्येकजण राज्यात येण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत होता. हॉटेलमध्ये सुरक्षित राहणार नसल्याने श्रीनगर येथील विमानतळावर एक रात्र घालवली. – अनिकेत घाटे, पर्यटक