मुंबई : राज्य सरकारने ‘दहिसर – मिरारोड मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन येथील डोंगरी गावातील ६९ एकर जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. परिमाणी. ‘मेट्रो ९’ची कारशेड उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
दहिसर – मीरा रोडदरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा या उद्देशाने एमएमआरडीए १०.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ९’ मार्गिकेची उभारणी करीत आहे. ‘मेट्रो ९’चे काम वेगात सुरू असताना या मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न गंभीर बनला होता. मुळ आराखड्यानुसार या मार्गिकेसाठी राई, मुर्धा, मोर्वा या गावात कारशेड उभारण्यात येणार होती. मात्र येथे कारशेड उभारण्यास स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला होता. अखेर रहिवाशांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने राई, मुर्धा, मोर्वा येथील कारशेड रद्द केली. स्थानिक रहिवाशांनीच कारशेडसाठी पर्यायी जागा सुचविली होती. त्यानुसार राज्य सरकारने उत्तन येथील डोंगरी गावातील जागेचा पर्याय निवडला आहे.
हेही वाचा… मुंबई : पावसात भिजल्यामुळे मुलाला बेदम मारहाण करणारा पिता अटकेत
हेही वाचा… साथीच्या आजारांविरोधातील मोहीम अधिक तीव्र; नियम धुडकावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा
डोंगरी येथील ६९ हेक्टर जागेवर कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने कारशेडसाठी ही जागा एमएमआरडीएला देण्यासाठीचे लेखी आदेश नुकतेच जारी केल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून येत्या आठ ते दहा दिवसांत ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. जागा ताब्यात आल्यानंतर कारशेडची उभारणी करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीए पुढील कार्यवाही करणार आहे. दरम्यान, कारशेड राई, मुर्धा,मोर्वा येथून डोंगरीला हलविण्यात आल्याने ‘मेट्रो ९’ मार्गिकेचा अंदाजे ५.५ किमीने विस्तार एमएमआरडीएला करावा लागणार आहे. या विस्तारीत मार्गिकेचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा विस्तार झाल्यास दहिसरवरून थेट उत्तन काही मिनिटात गाठता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गिकेचे शेवटचे स्थानक पॅगोडा आणि एस्सेल वर्ल्ड या दोन पर्यटनस्थळांच्या नजिक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात पॅगोडा आणि एस्सेल वर्ल्डला जाणे सोपे होणार आहे.
‘मेट्रो १२’च्या कारशेडची जागाही ताब्यात येणार
‘कल्याण – तळोजा मेट्रो १२’ मार्गिकेच्या आराखड्यात बदल करून आता ही मार्गिका नवी मुंबईतील पेंधरपर्यंत नेण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या निर्णयानुसार ‘कल्याण – तळोजा मार्गिके’च्या बांधकामाची निविदा रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी या मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न मात्र निकाली निघाला आहे. या मार्गिकेतील कारशेड पिसार्वे येथे प्रस्तावित होते. मात्र पिसार्वे येथील जागा खासगी मालकीची असल्याने आणि ही जागा ताब्यात घेण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने कारशेड पिसार्वेवरून कल्याण, शिळफाटा येथील निळजे-निळजेपाडा येथे हलविली आहे. निळजे-निळजेपाडा येथे ४५ हेक्टर सरकारी जागा असून ही जागा त्वरित ताब्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारशेडसाठी ही जागा निश्चित करण्यात आली. आता ही जागाही ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून ही जागा लवकरच ताब्यात येईल, अशी माहितीही एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही जागा ताब्यात आल्यास ‘मेट्रो १२’ मार्गिकेतील कारशेडच्या जागेचाही प्रश्न निकाली लागणार आहे.