विकास महाडिक
मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते. परंतु निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली. धुळ्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले आहेत.
हेही वाचा : मुंबई : ॲण्टॉप हिल येथे दहा शौचालये जाळली, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
अन्यत्रही कारवाई
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरविले जाणार आहे. या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याच्या तक्रारी धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली, पालघर या जिल्ह्यांतून आलेल्या आहेत. तक्रारीच्या निमित्ताने केसरी व पिवळे शिधापत्रिकाधारक वगळता सर्वच अर्जांची छाननी होणार आहे.
धुळे जिल्ह्यात चौकशीत एक प्रकरण समोर आले आहे. शासकीय योजनेचा दुहेरी फायदा घेतल्याने एका महिलेचे पैसे चलन भरून परत घेण्यात आले आहेत. त्यानुसार या महिलेला मिळालेले पैसे परत सरकारकडे जमा झाले आहेत. सरकारी धोरणानुसार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, धुळे
हेही वाचा : हवामान प्रकोपाचा हळदीला फटका; जाणून घ्या, देशभरात लाग
●धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेचे पाच महिन्याचे पैसे परत घेण्यात आले आहेत. खैरनार नामक महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
●अन्य एका योजनेतही आर्थिक लाभ घेतला होता. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचे तिला सांगण्यात आले. यानुसार साडेसात हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.