मुंबई : राज्याच्या शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका आता अधिक अद्ययावत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार अद्ययावत यंत्रसामुग्रीने सज्ज, प्राणवायू सुविधा, अत्याधुनिक स्ट्रेचर, हृदयविकारासंदर्भातील उपकरणे, डॉक्टर व निम्नवैद्यकीय कर्मचारी आदी सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका येत्या मार्चमध्ये रुग्णसेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मार्च २०२४ पासून राज्यातील रुग्णांना नव्या स्वरुपात अद्ययावत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय सेवा’ प्रकल्पांतर्गत (एमईएमएस) १०८ रुग्णवाहिका अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमित फॅसिलिटीज लिमिटेड इंडिया आणि स्पेनमधील एसएसजी ट्रान्सपोर्ट सॅनिटेरियो एसएल या कंपन्यांच्या माध्यमातून खासगी – सार्वजनिक तत्त्वावर अद्ययावत रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. राज्यामध्ये सध्या ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या बदल्यात १ हजार ७५६ नव्या रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामध्ये २५५ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, १ हजार २७४ बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, लहान मुलांसाठी ३६ विशेष रुग्णवाहिका, १६६ मोटारसायकल रुग्णवाहिका, १० समुद्री बोट रुग्णवाहिका आणि १५ नदीबोट रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका पाच टप्प्यांमध्ये हळूहळू बदलण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये सुरुवात होणार असून, या टप्प्यामध्ये नव्या स्वरुपातील ३०० ते ४०० रुग्णवाहिका सेवेत आणण्यात येणार आहेत. यामध्ये पाच समुद्री बोटींचा समावेश असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रथमच मार्चपासून समुद्री रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये हवाई रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यामध्ये राज्य सरकारचा ४९ टक्के वाटा असणार आहे.

हेही वाचा…वैद्यकीय शिक्षण संचलनालयाची वाट बिकटच!

रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पुण्यामध्ये आपत्कालिन प्रतिसाद केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र २४ तास सुरू राहणार असून, विविध रोगांवरील तज्ज्ञ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांना रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. रुग्णवाहिकेमध्ये एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांसह परिचारिकाही उपलब्ध असणार आहे. तसेच या रुग्णवाहिकेमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह जीवनरक्षक प्रणाली, डिजिटल ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम, कॅपनोमीटर, इलेक्ट्रिक सक्शन व्हॅक्यूम क्लिनर, आधुनिक स्ट्रेचर, ईसीजी सिस्टिम, अत्यावश्यक औषधे आणि टेलिमेडिसिन सुविधांनी ही रुग्णवाहिका सुसज्ज असणार आहे. संपूर्णत: अद्ययावत असलेली १०८ रुग्णवाहिका येत्या मार्चपासून रुग्णसेवेमध्ये दाखल होणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार या रुग्णवाहिका तालुका व शहरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती सुमित ग्रुप एंटरप्राइजचे उपाध्यक्ष सुमित साळुंके यांनी दिली.

हेही वाचा…तयार फराळांकडे ग्राहकांचा वाढता कल, फराळाच्या मागणीत ७० टक्क्यांनी वाढ

२० मिनिटांत पोहचणार रुग्णवाहिका

एखाद्या व्यक्तीने आपत्कालिन प्रतिसाद केंद्रामध्ये दूरध्वनी केल्यानंतर पुढील २० ते ३० मिनिटांमध्ये रुग्णवाहिका संबंधित ठिकाणी पोहचणार आहे. तसेच रुग्णाची प्रकृती फारच गंभीर असल्यास रुग्णवाहिका पोहचण्यापूर्वी मोटारसायकल रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचेल आणि रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यात येतील. रुग्णवाहिका पोहचल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयामध्ये हलविण्यात येईल.