महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याची महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची घोषणा हवेतच विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेसकोर्सबाबत ‘नरो वा कुंजरोवा’ची भूमिका घेतानाच याबाबत राज्य सरकारनेच उचित निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवून आयुक्त सीताराम कुंटे यांनी थीमपार्कबाबत शिवसेनेच्या भूमिकेला धक्का दिला आहे.
रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य थीमपार्क उभारण्याची मागणी शिवसेनेने केली असून महापौर सुनील प्रभू यांनी तसा प्रस्तावच मुख्यमंत्र्यांना दिला आहे. रेसकोर्स की थीमपार्क यावरून चर्चा रंगलेली असतानाच महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी याबाबतचा प्रस्ताव सोमवारी राज्य सरकारला पाठविला असून रेसकोर्सच्या निर्णयाचा चेंडू राज्य सरकारकडे टोलवला आहे. थीमपार्कबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून गटनेत्यांच्या बैठकीतही तसा निर्णय झालेला असताना महापालिका आयुक्तांनी मात्र त्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. उलट अनेक मोठय़ा शहरांमध्ये रेसकोर्स असल्याचे सांगत त्यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या भूमिकेशी फारकतच घेतली आहे.
रेसकोर्सवरील राज्य सरकारची जागा ‘शेडय़ूल डब्लू’मध्ये आहे. महापालिकेच्या नियमानुसार अशी अधिसूचित जागा मोकळी असेल तर त्याबाबत महापालिका निर्णय घेऊ शकते. मात्र या ठिकाणी रेसकोर्स असल्याने त्याबाबत राज्य सरकारनेच योग्य तो निर्णय घेऊन महापालिकेस मार्गदर्शन करावे, अशी विनंती आयुक्तांनी या प्रस्तावात केल्याचे समजते. नगरविकास विभागात या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू झाला असून ही जागा रेसकोर्ससाठीच ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र यावेळी रेसकोर्स व्यवस्थापनावर अनेक कठोर र्निबध लावण्यात येणार
असल्याचेही समजते.
रेसकोर्सबाबत राज्य सरकारनेच निर्णय घ्यावा
महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याची महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची घोषणा हवेतच विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेसकोर्सबाबत ‘नरो वा कुंजरोवा’ची भूमिका घेतानाच याबाबत राज्य सरकारनेच उचित निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवून आयुक्त सीताराम कुंटे यांनी थीमपार्कबाबत शिवसेनेच्या भूमिकेला धक्का दिला आहे.
First published on: 11-06-2013 at 03:29 IST
TOPICSरेसकोर्स
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State govt should take decision on racecourse sitaram kunte