मुंबई : जे.जे. रुग्णालयामध्ये अद्ययावत सोयी-सुविधा पुरवण्याबरोबरच अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यावर भर दिल जात आहे. जे. जे. रुग्णालयामध्ये कार्यरत कर्मचारी घसरून पडल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यावर किचकट शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या कर्मचाऱ्यावर अत्याधुनिक पध्दतीने ‘डिस्टल एंड ऑफ रेडीयस वॉलेट प्लेटींग’ शस्त्रक्रिया करून कर्मचाऱ्याला दिलासा दिला.

जे. जे. रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी विनोद दरेकर घसरुन पडल्याने त्यांच्या हाताच्या हाडाला इजा झाली होती. जे.जे. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर वॉरियर यांनी विनोद दरेकरच्या हाताचे क्ष किरण, रक्त आदी विविध तपासण्या केल्या. त्यानंतर त्याच्या हातावर किचकट व क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी दरेकर यांना सांगितले. दरेकर यांनी शस्त्रक्रिया करण्यास संमती दिल्यावर अस्थिव्यंग विभागातील डॉ. सुधीर वाॅरियर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. सुधीर वॉरियर यांनी विनोद दरेकर याच्या हातावर अत्याधुनिक पध्दतीने ‘डिस्टल एंड ऑफ रेडीयस वॉलेट प्लेटींग’ ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर काही तास विनोद दरेकर यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र हळूहळू विनोद दरेकर यांना बरे वाटू लागले. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच विनोद दरेकर यांना दिलासा मिळाला. खासगी रुग्णालयामध्ये ‘डिस्टल एंड ऑफ रेडीयस वॉलेट प्लेटींग’ शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च येतो. मात्र जे.जे. रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. त्यामुळे शस्त्रक्रियेचा कोणताही आर्थिक भुर्दंड विनोद दरेकर यांना बसला नाही.

हेही वाचा >>>दर्यापूरच्‍या जागेवरून नवनीत राणा-अडसूळ यांच्‍यात जुंपली

जे.जे. रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाच्या डॉक्टरांच्या तुकडीमध्ये डॉ. सुधीर वॉरियर यांच्यासारखे नामांकित शल्यचिकित्सक असणे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या ज्ञानाचा फायदा अस्थिव्यंग विभागातील निवासी डॉक्टर व विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत होत आहे.- डॉ. नादीर शहा, विभाग प्रमुख, अस्थिव्यंग विभाग

डॉ. सुधीर वॉरीयर हे जे.जे. रुग्णालयामध्ये विनावेतन किंवा कोणतेही अनुदान न घेता रुग्णसेवा देत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातून नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना नक्कीच होईल. जे.जे. रुग्णालयात अधिकाधिक सक्षम रुग्ण सेवा पुरविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.- डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय