रेल्वेच्या हद्दीत एखादा गुन्हा घडल्यावर त्याची जबाबदारी कोणाची, यावरून नेहमी होणारी वादावादी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकात्मिक दृष्टिकोन बाळगण्यासाठी रेल्वे ठोस उपाययोजना करणार आहे. त्यासाठी या सर्व विषयांवर खुलेपणाने चर्चा घडवण्याच्या उद्देशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू १५ जानेवारी रोजी दिल्लीत एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील सर्वच राज्यांच्या पोलीस महासंचालकांना बोलावण्यात आले आहे. तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांचाही या बैठकीत सहभाग असेल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी सांगितले. रेल्वे सुरक्षा दल आणि एम इंडिकेटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षेसाठी सुरू केलेल्या अॅपच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रवाशांची सुरक्षा ही वाहतूकदाराची जबाबदारी असते. उपनगरीय रेल्वेसह संपूर्ण देशभरात दर दिवशी दोन कोटी प्रवासी प्रवास करत असतात. या सर्वच प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेची आहे. मात्र यातील तांत्रिक अडचण म्हणजे कायदा व सुव्यवस्था ही बाब राज्याच्या अखत्यारीत येते. त्यामुळे रेल्वेमार्गावर घडणाऱ्या गुन्ह्य़ांचा तपास लोहमार्ग पोलिसांच्या हाती आहे. तर रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान, रेल्वेरूळ ओलांडणे, टपावरून प्रवास करणे आदी गोष्टींबाबतची कारवाई रेल्वे सुरक्षा दल करते. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेरे रेल्वे सुरक्षा दलाच्या हाती असले, तरी त्यांतील चित्रीकरण अनेक गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांच्या उपयोगी पडते. मात्र यासाठी दोहोंमध्ये बराच वादही सुरू असतो.
या सर्व वादावर तोडगा काढण्यासाठी आता थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच पुढाकार घेतला आहे. लोहमार्ग पोलीस हाती असलेल्या पोलीस महासंचालकांची बैठक प्रभू यांनी बोलावली असून ही बैठक १५ जानेवारी रोजी दिल्लीत होणार आहे. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह हेदेखील उपस्थित असतील. या बैठकीत रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस यांच्यातील समन्वयासाठी काय उपाययोजना करता येतील, लोहमार्ग पोलिसांना रेल्वेकडून काय सहकार्य अपेक्षित आहे, आदी गोष्टी जाणून घेतल्या जातील, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. दोन्ही दलांनी एकात्मिक दृष्टिकोन बाळगायला हवा. याबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक घेणार असून त्यांचाही दृष्टिकोन जाणून घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा