स्वत:चा वाढदिवस तसेच विवाहदिनानिमित्त राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष रजा देण्याची घोषणा अर्थमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे केली. पाटील यांच्या या घोषणेमुळे राज्यातील पोलिसांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून आपले पोलीस अधिकारी अतिरिक्त कामाच्या तणावाखाली असून त्यांना अनेकदा जादा डय़ुटय़ाही करायला लागतात. या पोलिसांचा तणाव आणि कामाचे ओझे कमी करण्यासाठी अनेक योजनांवर काम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा वाढदिवस तसेच विवाहदिनी त्यांना विशेष सुटी देण्याचा विचार असल्याचे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले. पोलिसांचा वाढदिवस अथवा त्यांच्या विवाहाच्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी त्यांना हक्काची रजा मिळावी, म्हणून आम्ही प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या पोलिसांना अशी सवलत मिळावी, असे आम्हालाही वाटत असल्याचे गृहमंत्री म्हणाले. राज्याच्या पोलीस दलात ५५ हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून आणखी ६४ हजार पोलिसांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.या सर्व नियुक्त्या अत्यंत पारदर्शीपणे तसेच गुणवत्तेवरच होतीलस असे पाटील यांनी स्पष्ट केले. हे सर्व सुरळीत पार पडल्यानंतर पोलिसांवरील कामाचा बोजा निश्चितपणे कमी होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. महिला पोलिसांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्त पोलिसांसाठी नवी मुंबईत एक गृहनिर्माणसंस्था उभारण्यात येत असून पोलिसांच्या सोसायटय़ांची दुरुस्ती करण्यासाठी सरकार दरवर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची माहिती गृहमंत्री पाटील यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा