लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. या चिन्हांशी साम्य असलेले ‘पिपाणी’ चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिले गेले. चिन्हांतील गोंधळामुळे पिपाणीला राज्यात दीड लाख मते पडली असून सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे ४५ हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात ३७ हजार मते अपक्ष उमेदवाराच्या पिपाणीला पडली आहेत. आम्ही भाषणात तुतारी चिन्हाचा प्रचार करत होतो. पण मतदारांमध्ये संभ्रम झाला. आम्ही यासदंर्भात निवडणूक आयोगाकडे मतदानापूर्वी तक्रार केली होती, मात्र त्याची दखल घेतली नाही, असे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>>अजित पवार गटाच्या आमदारांची आज बैठक;आमदार शरद पवार गटात परतण्याच्या चर्चेने अस्वस्थता
राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्याचे प्रमाण ८० टक्के राहिले आहे. १० जून रोजी राष्ट्रवादीचा पक्षाचा वर्धापन दिन आहे, त्या दिवशी राज्य सरकार विरोधात जनआंदोलनाच्या मोठ्या कार्यक्रमाची नेतृत्वाकडून घोषणा होणार आहे, असे पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे किमान १८० उमेदवार निवडून येतील. अजित पवार गटातील आमदार तुमच्या पक्षात येण्याची शक्यतेबाबत पाटील म्हणाले, जे तिकडे गेले आहेत, त्यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसतो आहे, असे ते म्हणाले.