मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पारा चढलेला असून, संपूर्ण राज्यात कडक उन्हाचा दाह सोसावा लागत आहे. राज्यातील बहुतांश केंद्रांतील कमाल तापमान ३० ते ३६ अंशादरम्यान होते. तर, किमान तापमान २० अंशापुढे होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामधील नागरिक दिवसा आणि रात्री उकाडय़ाने हैराण झाले होते. गेल्या शुक्रवार-शनिवारी मुंबईतील तापमानाने देशात उच्चांक गाठला होता. त्यामुळे मुंबई सर्वात ‘उष्ण शहर’ ठरले. मात्र, येत्या काही दिवसात नागरिकांना डिसेंबरमधील थंडी अनुभवता येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
डिसेंबर महिन्यात थंडीने हुडहुडी भरताच शेकोटी समोर बसून शेकण्यास आणि गरम कपडे घालण्यास सुरुवात होते. तसेच, गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेक जण बाहेरगावी जातात. मात्र, ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे यंदा डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात थंडी अनुभवता आली नाही. आता चक्रीवादळाचा परिणाम पूर्णपणे ओसरल्यानंतर आणि उत्तर भारतात एकापाठोपाठ एक पश्चिमी झंझावाताच्या परिणामामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात हळूहळू घसरण होत आहे. मात्र सरासरी तापमानापेक्षा ते दोन अंशाने अधिक आहे. यात घसरण होणार असून रात्रीच्या थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून संपूर्ण राज्यात पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन १० अंश सेल्सिअसपर्यंत तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होऊन २९ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातील उर्वरित दिवसात थंडीत वाढ होईल आणि ती डिसेंबरअखेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे. तसेच थंडीचा परिणाम राज्यासह दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेशातही जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
राज्यात आजपासून थंडी वाढण्याची शक्यता
पुणे : उत्तर भारतात दाट धुके आणि थंड हवा वाढल्यामुळे या भागात जोरदार थंडी सुरू झाली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरू होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या थंडीपैकी सुरुवातीच्या १५ दिवसांतील थंडी मंदौस चक्री वादळाने हिरावून घेतली होती. मंदौस चक्री वादळाचा परिणाम आता पूर्णपणे ओसरला आहे. उत्तर भारतात एका पाठोमाग एक संचलनित असलेल्या पश्चिमी झंजावाताच्या परिणामामुळेच सध्याचे महाराष्ट्रातील किमान व कमाल तापमान गेल्या दोन दिवसांपासुन हळूहळू घसरत आहे.