केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सबसिडीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे डिझेलच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागाला महिनाभरात तब्बल सव्वा कोटी रुपये जास्त मोजावे लागले आहेत. त्या तुलनेत खासगी पेट्रोल पंपावर डिझेलचे दर कमी असल्याने त्या ठिकाणी बसगाडय़ांमध्ये डिझेल भरण्याचा निर्णय ठाणे विभागाने घेतला असून त्याची बुधवारपासून अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मात्र, आधीच अरुंद रस्ते असणाऱ्या ठाण्यामधील पेट्रोल पंपावर एसटीच्या बसगाडय़ा डिझेल भरू लागल्या तर शहरातील वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सबसिडी काढून घेण्याचा निर्णय घेतला असून त्याची १ जानेवारीपासून अंमलबाजवणीही सुरू झाली आहे. या निर्णयामुळे डिझेलच्या दरात वाढ झाल्याने राज्य परिवहन सेवेला आर्थिक तोटा सोसावा लागत आहे. राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागामध्ये ठाणे -१, ठाणे-२, कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, भिवंडी, शहापूर, वाडा असे आठ बस डेपो असून त्यामध्ये ६१९ बसगाडय़ा आहेत. त्यापैकी ६० बसगाडय़ा सीएनजी तर उर्वरित सर्व बसगाडय़ा डिझेल इंधनावर धावतात. या बसगाडय़ा महिन्याला सुमारे ५५ लाख किमी अंतर कापतात, त्यासाठी सुमारे पाच लाख २० हजार लिटर डिझेल लागते. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयामुळे ठाणे विभागाला डिझेलकरिता दहा ते बारा रुपये जास्त मोजावे लागत असून महिनाभरात तब्बल एक कोटी २४ लाख रुपये डिझेलसाठी जास्त भरावे लागले आहेत. त्या तुलनेत खासगी पेट्रोल पंपावर डिझेलचे दर कमी असल्याने त्या ठिकाणी बसगाडय़ांमध्ये डिझेल भरण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार, बुधवारपासून डिझेल भरण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती ठाणे विभागाचे नियंत्रक प्रकाश जगताप यांनी दिली.  मात्र, ठाणे विभागाच्या या निर्णयामुळे डिझेल भरण्यासाठी बसगाडय़ा शहरातील अरुंद रस्त्यांवरून प्रवास करणार आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Story img Loader