खालावलेल्या प्रवासी भारमानामुळे चिंतेत असलेल्या एसटी महामंडळातर्फे प्रवासी भारमान वाढवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. एसटीच्या वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करून ते कौटुंबिक कार्ड बनवण्याबाबतचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत तब्बल चार महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र संपूर्ण कुटुंबाला सामावून घेणारी ही योजना अद्याप तरी कागदोपत्रीच आहे. या योजनेनुसार ५०० रुपये भरून सर्व कुटुंबाला प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत मिळणे अपेक्षित आहे.
एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना विविध सवलती देण्यात येत असल्याचे महामंडळ वारंवार सांगते. यापैकीच एक म्हणजे वार्षिक सवलत कार्ड! कोणत्याही व्यक्तीला २०० रुपये शुल्क भरून हे कार्ड मिळते. या कार्डाच्या आधारे वर्षभरात एसटीने कोठेही प्रवास करताना या व्यक्तीला १० टक्के सवलत मिळते. मात्र ही सवलत फक्त कार्डधारक व्यक्तीलाच मिळते. परिणामी एका कुटुंबातील सर्वाना ही सवलत हवी असल्यास, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने वार्षिक सवलत कार्ड काढणे आवश्यक होते.
या नियमात बदल करणारा ठराव महामंडळाच्या संचालक मंडळाच्या २६ ऑगस्ट २०१४च्या बैठकीत मांडण्यात आला होता. या ठरावानुसार वार्षिक सवलत कार्ड या संकल्पनेऐवजी कौटुंबिक वार्षिक सवलत कार्ड ही संकल्पना पुढे आणण्यात आली. या संकल्पनेनुसार ५०० रुपयांचे सवलत कार्ड दिले जाणार आहे. या कार्डाचा वापर चार जणांच्या कुटुंबासाठी होऊ शकेल. या कुटुंबाने वर्षभरात एसटी महामंडळाच्या शिवनेरी वगळता इतर कोणत्याही गाडीने प्रवास केल्यास संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत मिळणार आहे.
मात्र, महामंडळाच्या संचालक मंडळात हा ठराव संमत होऊनही त्याबाबतचा निर्णय अद्यापही एसटीतील संबंधित खात्यांकडे पोहोचलेला नाही. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी स्वत:च ठरावाची अमलबजावणी न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

Story img Loader