एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराबाबत अद्याप निर्णय झाला नसतानाच कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वाढीव वेतन (किमान वेतन) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेतन कराराशिवाय वाढीव वेतन मिळण्याची ही महामंडळातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते.
एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार अद्याप पूर्णावस्थेत आलेला नाही. त्या करारानुसार सर्व कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ मिळाली आहे. तर किमान वेतनवाढ २५ टक्के मिळावी अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. जोपर्यंत ही वाढ मिळत नाही तोपर्यंत करारावर स्वाक्षरी करण्यास अधिकृत मान्यताप्राप्त संघटनेने नकार दिला आहे. या करारानुसार कनिष्ठ कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि त्यावर १० टक्के वाढ मिळणार असून नव्या कराराचा लाभ केवळ त्यांनाच होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला होता. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने अलीकडेच मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन तात्काळ देण्याचे आदेश महामंडळाला दिले होते. या आदेशानुसार कनिष्ठ कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन वाढीव वेतनानुसार मिळणार आहे. याचा फायदा सध्या महामंडळात असलेल्या २६४०१ कामगारांना तब्बल तीन वर्षांंनंतर ३२०० ते ४८०० रुपये वेतनवाढीने मिळणार आहे. तर नव्याने भरती झालेल्या १९७८९ कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. महामंडळाने सध्या केवळ किमान वेतनश्रेणीनुसार कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू केले असून त्यांची थकबाकी नंतर करार झाल्यावर देण्यात येणार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader