राज्य परिवहन महामंडळाची सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी शिवनेरी ही सेवा सध्या अत्यंत मर्यादित स्वरूपात असली, तरी येत्या दोन वर्षांत या सेवेचा विस्तार करण्याची योजना एसटी महामंडळाने आखली आहे. त्यासाठी एसटीतील शिवनेरी गाडय़ांची संख्या २००पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे ‘शिवनेरी’ सेवा इतर नव्या मार्गावरही चालवण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीकडे सहसा न वळणारा प्रवासीही ‘वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन’ असे म्हणण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाची शिवनेरी सेवा सध्या मुंबई-पुणे (दादर), ठाणे-पुणे, पुणे-औरंगाबाद या तीन मार्गावर चालवली जाते. त्यातही ही सेवा प्रामुख्याने मुंबई, ठाणे ते पुणे या दरम्यानच सर्वात जास्त यशस्वी ठरली आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात ११० शिवनेरी गाडय़ा आहेत. त्यापैकी बहुतांश गाडय़ा एसटीने भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. मात्र या गाडय़ांपैकी ४६ गाडय़ांचा करार जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे.
आता एसटीने आपल्या ताफ्यात ७० नव्या शिवनेरी गाडय़ा विकत घेणार आहे. यापैकी ३५ गाडय़ा व्होल्वो कंपनीच्या असून उर्वरित ३५ गाडय़ा स्कॅनिया या कंपनीच्या आहेत. व्होल्वो कंपनीच्या १२ गाडय़ा एसटी महामंडळात दाखल झाल्या आहेत. या ७० गाडय़ा आल्यानंतर एसटीकडे १३४ शिवनेरी गाडय़ांचा ताफा असेल. तसेच पुढील दोन वर्षांत आणखी ६६ शिवनेरी गाडय़ा विकत घेऊन एसटी महामंडळ आपल्या ‘शिवनेरी’ ताफ्यातील गाडय़ांची संख्या २००पर्यंत नेणार असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले.
मुंबई, ठाणे ते पुणे या मार्गाशिवाय अन्य मार्गावरही ‘शिवनेरी’ सेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. त्यानुसार योग्य आढावा घेऊन मुंबई-नाशिक, ठाणे-नाशिक, पुणे-औरंगाबाद, पुणे-कोल्हापूर, पुणे-सातारा, मुंबई-गोवा आदी मार्गावर शिवनेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही खंदारे यांनी स्पष्ट केले. एसटीने आपली नवीन ओळख प्रस्थापित करण्यासाठी ‘शिवनेरी’ सेवेला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. या नव्या योजनेमुळे पुढील दोन वर्षांत विविध मार्गावर प्रवाशांना आरामदायक सेवा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader