आठवडय़ाच्या शेवटी पुण्याला जाण्यासाठी वाशीजवळ महामार्गावर बससाठी थांबावे.. एसटीची दादर-स्वारगेट ही शिवनेरी बस यावी आणि त्यात एकही जागा असू नये.. हा अनुभव घेतलेल्या नवी मुंबईकर प्रवाशांना आता एसटीने खुशखबर दिली आहे. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी पुण्याला जाणाऱ्या गर्दीचा विचार करून एसटीने वाशी आणि पनवेल येथून खास ‘शीतल सेवा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील पहिली गाडी येत्या शनिवारी, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता वाशीहून रवाना होईल. विशेष म्हणजे एसटीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विकास खारगे यांची नियुक्ती झाल्यानंतर एसटीने सुरू केलेली ही पहिलीच सेवा आहे.
वाशी महामार्गावर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी नेहमीचीच असते. अनेकदा हे प्रवासी शिवनेरीसाठी थांबतात. मात्र दादर, चेंबूर येथून भरून येणाऱ्या शिवनेरीमध्ये एखादीच जागा असते. त्यामुळे मग नाईलाजाने नवी मुंबईतील प्रवासी खासगी बसगाडय़ांनी पुणे गाठतात. या प्रवाशांना एसटीकडे वळवण्यासाठी एसटीने ही सेवा सुरू केली आहे, असे एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.
ही सेवा दर शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी सकाळी आठ वाजता वाशी महामार्ग येथून सुटणार आहे. नेरूळ, कोकणभवन, खारघर, कामोठे, पनवेल, द्रुतगती मार्ग, वाकड, हिंजवडी, चांदणी चौक, वनाज, एसएनडीटी, डेक्कन कॉर्नर या मार्गाने ही बस सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वारगेटला पोहोचेल. या फेरीसाठी २५९ रुपये शुल्क असेल. परतताना ही बस स्वारगेटहून दादरच्या दिशेने सकाळी ११ वाजता रवाना होईल. ही बस दुपारी २.२५च्या सुमारास दादरला पोहोचेल. या सेवेचे प्रवासभाडे २९२ रुपये असेल. नवी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघणारी दुसरी फेरी पनवेलहून दुपारी ३.५० ला निघून स्वारगेटला ५.४५ वाजता पोहोचेल. पनवेल ते स्वारगेट प्रवासासाठी २१६ रुपये प्रवासभाडे आकारण्यात येईल. ही बस स्वारगेटहून सायंकाळी ६.१५ वाजता दादरला रवाना होईल. दादरला ही बस रात्री साडेनऊ वाजता पोहोचणार आहे. सध्या ही सेवा फक्त सुटीच्या दिवसांपुरती मर्यादित असली, तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही सेवा पुढे वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Story img Loader