एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पाच-सहा हजार कामगारांनी हजेरी लावली, तरी राज्यभरातील एसटी वाहतुकीला त्याचा फारसा फटका बसला नाही. पुणे, नाशिक, पालघर व कोकणात काही ठिकाणी नजीकच्या अंतरातील वाहतुकीवर परिणाम झाला. सुमारे १० टक्के फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तरी लांबपल्लाच्या गाडय़ा सुरळीत सुरू होत्या. महामंडळाचे दररोजचे उत्पन्न सुमारे १३ कोटी रूपये असून त्यापैकी सुमारे ९८ लाख रूपयांचे शुक्रवारचे उत्पन्न बुडाले.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला मंगळवारी चर्चेसाठी आमंत्रित केले असल्याचे आमदार राम कदम यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेने काढलेल्या मोच्र्याचा कोणताही परिणाम मुंबईसह विदर्भ, अमरावतीमध्ये जाणवला नसल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मोर्चात एसटीचे कर्मचारी फारसे नव्हते, तर मनसेचे स्थानिक कार्यकर्तेच सहभागी झाले होते, असे महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी सांगितले. या मोर्चामुळे महामंडळाचा एक कोटी १७ लाख रुपयांचा महसूल गुरुवारी बुडाला आहे. एसटीच्या राज्यभरातील २४८ डेपोंपैकी एकही डेपो पूर्ण बंद नव्हता. काही प्रमाणात स्थानिक पातळीवर वाहतूक विस्कळीत अथवा गाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरूनगर या आगारांमधील वाहतूक सुरळीत सुरू होती. विदर्भ, अमरावती व मराठवाडा विभागात वाहतुकीवर कोणताही परिणाम जाणवला नाही. दादरहून पुण्याला जाणाऱ्या वातानुकुलीत शिवनेरी आणि एशियाड गाडय़ांची वाहतूकही वेळापत्रकानुसार सुरू होती. या मोर्चात सहभागी झालेल्या कामगारांना शोधणे कठीण असून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य नसल्याचे महामंडळातील सूत्रांनी सांगितले.  या मोर्चामध्ये राज्यभरातून सुमारे २५ हजार कामगार सहभागी झाल्याचा दावा मनसे वाहतूक सेनेने केला असला तरी पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा आकडा आठ-दहा हजारांच्या घरात आहे. त्यापैकी एसटीचे कामगार किती व मनसेचे कार्यकर्ते किती, हे स्पष्ट झालेले नाही. महामंडळाच्या विविध विभागातून आलेले कामगार प्रामुख्याने वाहक-चालक होते. राज्यभरात एसटीच्या  दररोज ९० हजार फेऱ्या होतात. त्यापैकी सुमारे आठ हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. नजीकच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. मोर्चात सहभागी झालेल्या कामगारांवर कारवाई करण्याबाबत महामंडळ द्विधा मनस्थितीत आहे. कामगारांचे दररोज सुमारे ५० रजेचे अर्ज असतात. ते मोर्चामध्ये सहभागी असतीलच असे सांगता येत नाही. काही कामगार सकाळी कामावर आले नाही व दुपारी आले, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्या नेतृत्त्वाखालील या मोर्चात आमदार बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, राम कदम आदी सहभागी झाले होते.

Story img Loader