रिक्षासाठी खुले केलेले परवाने त्वरित रद्द करावे, मॅक्सीकॅबला वेसण घालावी आदी विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधीची शनिवारी मुंबईतील काळबादेवी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ५० हून अधिक रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सिमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली. या बैठकीत विविध मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

सीएनजी दरवाढीमुळे काही रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. मात्र या भाडेवाढऐवजी सीएनजीवर ४० टक्क्यांपर्यंत अनुदान द्यावे, त्यामुळे चालकांना सीएनजी स्वस्तात मिळेल, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनसह अन्य काही संघटनांकडून करण्यात आली आहे. त्या मागणीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या मॅक्सीकॅबला परवानगी द्यायची की नाही यावर विचार करण्यासाठी सध्या शासनाने समिती नेमली असून त्यासंदर्भात बैठकही झाल्या. मॅक्सीकॅबला एसटी महामंडळ तसेच कामगार संघटनांनीही विरोध दर्शविला आहे. मॅक्सीकॅबला परवानगी मिळाल्यास एसटी आणि रिक्षालाही मोठा फटका बसेल. त्यामुळे मॅक्सीकॅबवर कारवाई करण्याच्या मुद्यावर संघटना ठाम आहेत. यासह विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. मुंबई महानगरातील रिक्षा संघटनांसोबतच, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण परिसरातील ५० हून अधिक रिक्षा संघटनांचे सुमारे ८० ते ९० प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.