भाजपा नेते किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद अगदी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. आता या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. त्या मंगळवारी (१८ जुलै) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा जो आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाला तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी राज्य महिला आयोगाकडे विचारणा केली. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांना या संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणी वस्तूस्थितीदर्शक अहवाल लवकरात लवकर आयोगाला सादर करण्याबाबतही सांगितलं आहे.”
“या प्रकरणी आयोगाकडे कोणतीही माहिती आलेली नाही”
“आतापर्यंत पीडित महिला आपल्याकडे तक्रार घेऊन आली, तर आपण कारवाई करतोच. त्याहीपुढे जाऊन सामूहिक बलात्कार किंवा इतर गुन्ह्यांमध्ये आपण स्वतः दखल घेतो. त्यामुळे पीडित महिलांची तक्रार आली, तर त्याची नक्कीच दखल घेतली जाते. आतापर्यंत या प्रकरणी आयोगाकडे कोणतीही माहिती आलेली नाही. पोलिसांचा आम्हाला अहवाल येईल तेव्हा त्यावर आम्ही कारवाई करू,” असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
हेही वाचा : “व्हायरल व्हिडीओतील ‘ती’ महिला…”, किरीट सोमय्या प्रकरणावर अनिल परब आक्रमक
देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”
“मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे दावे केले जात आहेत”
“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.
हेही वाचा : “महाराष्ट्रात अजित पवार आणि त्यांचे सहकारी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं दिल्लीत वक्तव्य
सर्व व्हिडीओंची सत्यता तपासून चौकशी करावी”
“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.