मुंबई : हनुमान चालीसा पठणाशी संबंधित नाही, तर १२ दिवस न्यायालयीन कोठडीत आलेल्या अनुभवांबाबत आपण प्रसिद्धीमाध्यमांसमोर वक्तव्य केले होते. त्यामुळे आपल्याकडून जामिनाच्या कोणत्याही अटींचा भंग झालेला नाही, असा दावा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी बुधवारी विशेष न्यायालयात केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटक करण्यात आल्यावर १२ दिवसांनी विशेष न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. त्या वेळी न्यायालयाने त्यांना प्रसिद्धीमाध्यमांसमोर हनुमान चालीसा पठणाशी संबंधित कोणतेही वक्तव्य करण्यापासून अटक करण्यास मज्जाव केला होता. तसेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्यास त्यांचा जामीन रद्द करण्याचेही न्यायालयाने बजावले होते.
परंतु जामिनावर बाहेर पडताच राणा दाम्पत्याने पुन्हा एकदा हनुमान चालीसा पठणाशी संबंधित वक्तव्ये प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखती देताना केली. त्यामुळे त्यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले असून त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयानेही राणा दाम्पत्याला नोटीस बजावून त्यांना म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते.
याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी राणा दाम्पत्याने प्रतिज्ञापत्र दाखल करून जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा पोलिसांच्या दाव्याचे खंडन केले. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण केवळ आपल्या १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीबाबत आणि ते कोठडीत असताना पालिकेने त्यांच्या मुंबईतील घराबाहेर लावलेल्या नोटिशीबाबत बोलल्याचा दावा केला.
सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाबाबतच्या कलमाबाबत नुकत्याच दिलेल्या आदेशाकडेही राणा दाम्पत्याने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना राजद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यास, या कलमांतर्गत दाखल गुन्ह्यांची चौकशी थांबवण्यास आणि या आरोपाअंतर्गत अटकेत असलेल्यांनी संबंधित न्यायालयाकडे दाद मागण्याची मुभा दिली होती. दरम्यान, पोलिसांच्या अर्जावर न्यायालयाने १५ जूनला सुनावणी ठेवली आहे.