मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबरअखेर २९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. पंधरा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर हंगामाने आता गती घेतली आहे. साखर पट्ट्यात चांगली थंडी असल्यामुळे साखर उताराही चांगला मिळत असल्यामुळे गाळपाला वेग आला आहे. साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा सहकारी ९६ आणि खासगी ९४, अशा एकूण १९० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. दैनंदिन सरासरी ९ लाख ६९ हजार ८०० टन क्षमतेने उसाचे गाळप सुरू आहे. डिसेंबरअखेर ३३८ लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी ८.६ टक्के साखर उताऱ्याने एकूण २९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर साखर विभाग आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागात ३९ कारखाने गाळप करीत असून, त्यांनी ७८ लाख टन उसाचे गाळप करून १०.१३ टक्के साखर उताऱ्याने सात लाख टन साखर उत्पादन केले आहे. पुणे विभागानेही सात लाख टन साखर उत्पादन केले आहे. गत वर्षी डिसेंबरअखेर सहकारी १०१ आणि खासगी १०३, अशा २०४ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. दैनंदिन ९.९४ लाख टन क्षमतेने गाळप करून ४३० लाख टन उसाचे गाळप पूर्ण करून सरासरी ८.९ टक्के साखर उताऱ्याने ३८ लाख टन साखर उत्पादन केले होते. गत वर्षाच्या तुलनेत कमी कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊस गाळप, साखर उत्पादन आणि साखर उताऱ्यातही घट झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा…अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांची मागणी

राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादन शक्य

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनने (विस्मा) चालू गाळप हंगामात १०० ते १०२ लाख साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापैकी १२ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविले जाऊन निव्वळ साखर उत्पादन ९० लाख टनांवर जाण्याचा अंदाज विस्माने व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ केल्यामुळे साखर आणि इथेनॉल उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे किमान साखर विक्री दर ४१ रुपये प्रति किलो करावा. उसाचा रस, बी हेवी मोलॅसिस, सी हेवी मोलॅलिसपासून तयार केलेल्या इथेनॉल खरेदीचे दर तीन ते पाच रुपयांनी वाढवावेत, अशी आग्रही मागणी विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: States sugar mills produced 29 lakh tonnes sugar by december with season gaining momentum mumbai print news sud 02