कुलदीप घायवट, लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय हिंदी संचालनालयाने तीन वर्षांपूर्वी मराठीप्रमाणे हिंदी शब्दांमध्ये ‘ळ’ लिहिणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार दक्षिणेकडील राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र राज्यातील मध्य, पश्चिम, कोकण रेल्वे प्रशासनाला ‘ळ’ चे वावडे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या तिन्ही रेल्वेमधील स्थानकाची नावे हिंदीत चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात येत असून स्थानकांच्या नावांचा अपभ्रंश होत आहे. 

हेही वाचा >>> Video: क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अडचणीत; सोशल इन्फ्लुएन्सर सपना गिलनं केली विनयभंगाची तक्रार, गुन्हा दाखल!

केंद्रीय हिंदी संचालनालयातर्फे डिसेंबर २०१९ मध्ये ‘ळ’ वर्ण राजभाषा हिंदीच्या परिवर्धित वर्णावलीमध्ये स्वीकृत करण्याचा निर्णय झाला. राज्यातील केंद्रशासित कार्यालयांना स्थानिक भाषेप्रमाणे हिंदीतही ‘ळ’ वर्ण लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे भायखळा, चिपळूण, सफाळे आदी स्थानकांची नावे हिंदीत ‘भायखला’, ‘चिपलूण’, सफाले अशी न लिहिता मराठीप्रमाणेच लिहिण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘ळ’ऐवजी ‘ल’ लिहिणे सूचनांचा भंग ठरणार असून याबाबत केंद्र सरकारच्या हिंदी आणि राजभाषा विभागाकडे तक्रार करता येणे शक्य झाले आहे. केरळमध्ये हिंदीत ‘ळ’चा वापर करण्यास सुरुवात झाली असून रेल्वे स्थानकांतील नामफलक, एक्स्प्रेसच्या नावात बदल करण्यात आला आहे. तसेच, राज्यातील अनेक केंद्रीय कार्यालयांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 

हेही वाचा >>> राष्ट्रीय उद्यानातील वाघाच्या तीन बछडय़ांचा मृत्यू

काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या राजभाषा अधिकाऱ्यांशी संपर्क करून याबाबतची माहिती देण्यात आली होती, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टिळक’ला ‘तिलक’, ‘लोणावळा’ला ‘लोनावला’ लिहिण्यात येईल, असे सांगितले. मात्र, दक्षिण राज्यातील रेल्वे प्रशासनाने हिंदीत रेल्वे स्थानकांचे नाव लिहिताना ‘ळ’ वर्णाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेमधील परप्रांतीय अधिकाऱ्यांमुळे अद्याप सुधारणा झालेली नाही.

प्रकाश निर्मळ, भाषा अभ्यासक

यासंदर्भात कोकण रेल्वेच्या राजभाषा विभागाकडून अधिक माहिती घेण्यात येईल आणि संबंधितांना कळवण्यात येईल.

एल. के. वर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

याप्रकरणी लक्ष घालून माहिती देण्यात येईल.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या राजभाषा विभागाकडून यासंदर्भात माहिती घेऊन संबंधितांना कळवण्यात येईल.

सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

या स्थानकांतील नामफलकांवर होणार बदल

भायखळा, वडाळा, चिंचपोकळी, परळ, विक्रोळी, कळवा, टिटवाळा, उंबरमाळी, नेरुळ, नेरळ, तळोजे पांचनंद, निजळे, केळवली, डोळवली, सफाळे, केळवे रोड, उमरोळी, चिपळूण, कुडाळ.

महाराष्ट्र, दक्षिणी राज्यांसह उत्तरेतील काही राज्यांत व केंद्र शासित प्रदेशांतील स्थानिक भाषेत ‘ळ’ वर्ण आहे. मात्र, ‘ळ’ वर्ण हिंदीमध्ये वापरात न आल्यामुळे देशातील बरीच नावे चुकीच्या पद्धतीने लिहिली जातात. त्याचप्रमाणे तशी ती नावे बोललीही जातात. हिंदीच्या परिवर्धित वर्णावलीत ‘ळ’ चा वापर केल्याने महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या नावाचा अपभ्रंश थांबवता येणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया मराठीप्रेमींनी व्यक्त केली. 

रेल्वेकडून महापुरुषांच्या नावाचा अनादर

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवरील हिंदी भाषेतील नामफलकावर ‘टिळक’ लिहिणे अपेक्षित आहेत. हिंदी वर्णमालेत ‘ट’ वर्ण आहे. मात्र, स्थानकांवरील नामफलकांवर ‘तिलक’असे नमुद करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण देशात त्यांचे नाव विकृत स्वरूपात लिहिले जात असून मध्य रेल्वेकडून महापुरुषांच्या नावाचा अनादर केला जात आहे. रेल्वेकडून महापुरुषांचा अनादर होत आहे. स्थानकांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिली जात आहेत. रेल्वेला अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही स्थानकांच्या नावात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता रेल्वे विभागाच्या मुख्य कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठीप्रेमींनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Station names in central western konkan railways of maharashtra written incorrectly in hindi mumbai print news zws