स्टेशन छोटे असो वा मोठे, प्रत्येक स्टेशनातील स्टेशन मास्तर किंवा सध्याच्या भाषेत स्टेशन अधीक्षक हा त्या स्टेशनाचा सर्वेसर्वा असतो. एकाच वेळी रेल्वेतील आपल्या वरिष्ठांचे आदेश घेण्यापासून त्यांना सूचना देण्यापर्यंत आणि त्याच वेळी प्रवाशांची आघाडी सांभाळण्यापर्यंत सर्व कसरती हा स्टेशन अधीक्षक करत असतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वेविषयीच्या बातम्यांचे वार्ताकन करताना अनेकदा रेल्वे अधिकाऱ्यांकडून काही खुमासदार किस्से ऐकायला मिळतात. एका निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने ऐकवलेला हा किस्सा.. भारतीय प्रशासकीय सेवेतील रेल्वेसाठीची ‘आयआरटीएस’ परीक्षा उत्तीर्ण झालेला हा अधिकारी विभागीय रेल्वे व्यवस्थापकपदी पोहोचला. एका मोठय़ा विभागाचा सर्वेसर्वा झालेल्या या अधिकाऱ्याने आनंदाने आपल्या आईला दूरध्वनी करून आपल्या बढतीची माहिती दिली. त्यावर ती माउली गहिवरून म्हणाली, ‘‘ते ठीक आहे, पण तू स्टेशन मास्तर कधी बनणार?’’ त्या अधिकाऱ्याला हसावे की रडावे, हेच कळे ना!

यातील विनोदाचा भाग वगळला, तर एखाद्या खेडेगावात किंवा छोटय़ा शहरात हयात घालवलेल्या त्या आईच्या शब्दांमागील अर्थ खूप महत्त्वाचा आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक या पदापेक्षाही त्या बाईला स्टेशन मास्तर मोठा वाटावा, हेच त्या पदाचे यश आहे. हा रेल्वेतला त्या-त्या स्थानकाचा संस्थानिक असतो, असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. उपनगरीय लोकलने प्रवास करताना हा स्टेशन मास्तर किंवा स्टेशन

अधीक्षक बऱ्याचदा पेन्शनीत गेलेल्या संस्थानिकासारखा भासतो; पण ‘रेल्वेचा सदिच्छादूत’ अशी ओळख असलेला स्टेशन मास्तर हा प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वेचा चेहरा असतो. हे पद एवढे महत्त्वाचे का? स्टेशन मास्तराला काय काय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात? जाणून घेऊ या..

विशेष म्हणजे स्टेशन अधीक्षकाची नेमणूक होताना त्याच्या मानसिक क्षमतेची चाचणी घेतली जाते. ही चाचणी रेल्वेत फक्त याच पदासाठी घेतात, यावरून या पदाचे महत्त्व लक्षात यावे. या पदावरील व्यक्तीला दर तीन वर्षांनी पुन्हा ही चाचणी द्यावी लागते. त्यांच्यासाठी खास प्रशिक्षण वर्गही ठरावीक कालावधीने घेतले जातात.

प्रत्येक स्थानकाची एक हद्द असते. ती आधीच्या स्थानकापुढून सुरू होऊन पुढील स्थानकाच्या थोडीशी आधी संपते. या भागाला स्टेशन सेक्शन म्हणतात. या संपूर्ण भागातील गाडय़ांच्या वाहतुकीची जबाबदारी स्टेशन अधीक्षकावर असते. ती समर्थपणे पेलण्यासाठी ओव्हरहेड वायर, अभियंते आणि सिग्नलिंग व टेलिकम्युनिकेशन अशा तीनही खात्यांतील कर्मचारी त्याच्या दिमतीला असतात. त्याच्या हद्दीतल्या सेक्शनमध्ये कोणतेही काम करायचे असले, तर त्याच्या परवानगीशिवाय करता येत नाही. त्या सेक्शनच्या नियंत्रकाशी बोलून तो या विशेष ब्लॉकसाठी परवानगी देत असतो.

स्टेशन अधीक्षक डय़ुटीवर आला की, त्याला आधी डय़ुटीवर असलेल्या अधीक्षकाने भरलेली डायरी तपासावी लागते. सिग्नलिंग पॅनलचे काऊंटर, क्रॉसओव्हरवर असलेले पॉइंट्स, क्लॅम्प्स आदी सर्व गोष्टी बरोबर जागच्या जागी आहेत की नाही, याची तपासणी त्याला करावी लागते. त्याच्या हाताखाली त्या स्थानकात असलेला कर्मचारीवर्ग, त्यांच्या सुटय़ा, त्यांच्या डय़ुटय़ा, पगारासाठी त्यांची हजेरी या सगळ्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. त्यात स्टेशन अधीक्षक नेहमी स्थानकात असल्याने प्रवाशांच्या कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्याचे कामही तो करत असतो. अनेकदा प्रवासी अनेक तक्रारी घेऊन येत असतात. कोणाला कोणती गाडी कुठे जाते हे जाणून घ्यायचे असते, तर कोणाला बुकिंग क्लार्कने सुटे पैसे दिलेले नसतात, कोणी तरी तिकीट तपासनीसाने उद्दामपणा केल्याचे सांगत येतो, तर कोणी स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याची तक्रार घेऊन येतो.. प्रत्येकाची समस्या जाणून घेऊन तो त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा ती तक्रार नोंदवून घेतो.

कागदोपत्री स्टेशन अधीक्षकाला आठ तासांची डय़ुटी असते; पण त्याच्या डय़ुटीचा ताबा घेणारा उपअधीक्षक किंवा स्टेशन अधीक्षक येत नाही, तोपर्यंत तो त्याची जागा सोडून हलू शकत नाही. डय़ुटीच्या कालावधीतही जेवणासाठीची ठरावीक वेळ नसलेले हे रेल्वेतील कदाचित एकमेव पद आहे. त्यामुळे अनेकदा जेवत असताना त्याच्या सेक्शनमध्ये गाडीखाली कोणी आल्यास जेवण अर्धवट टाकूनही त्याला उठावे लागते.

गाडी चालवण्याशिवाय स्टेशन अधीक्षकाला जवळपास सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या कामांचे जुजबी ज्ञान असते. अपघाताच्या काळात तर या पदावरील व्यक्तीची कसोटी असते. ज्या ठिकाणी माणूस गाडीखाली आला असेल, तिथपर्यंत पोलिसांना घेऊन जावे लागते. प्रथमोपचार करण्यासारखे असतील, तर ते पुरवावे लागतात. अनेकदा जखमी वा मृत प्रवाशांना स्ट्रेचरवर उचलण्यासाठी हमाल उपलब्ध नसतात. अशा वेळी बरेच स्टेशन अधीक्षक स्टेशन परिसरातील गर्दुल्ले किंवा तत्सम लोकांना दर दिवशी ५०-६० रुपये देऊन हाताशी धरून ठेवतात. जखमी प्रवाशाला रुग्णालयात पोहोचवेपर्यंत स्टेशन अधीक्षकाची जबाबदारी संपत नाही.

रेल्वेचा काही अपघात झाला, तर त्याला डोके शांत ठेवूनही डोके कापलेल्या मुरारबाजीप्रमाणे अनेक आघाडय़ांवर लढावे लागते. सर्वप्रथम विभाग नियंत्रकाला त्या अपघाताबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना अपघाती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लागणारी सर्व मदत स्टेशन अधीक्षकाला करावी लागते. यात ब्रेक व्हॅन, वैद्यकीय मदत अपघातस्थळी पोहोचवण्यापासून वरिष्ठांना कामाचा तपशील देण्यापर्यंत आणि अपघाताच्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यापासून स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना परिस्थितीची माहिती देणे, जखमींची वा मृतांची यादी तयार ठेवणे आदी सगळी कामे त्याला सांभाळावी लागतात.

रेल्वेच्या तिकीट बुकिंग क्लार्क किंवा मोटरमन-गार्ड यांच्याप्रमाणे स्टेशन अधीक्षकांनाही सुटी किंवा सणासुदीचे दिवस असे काहीही नसते. संपूर्ण दुनिया नटूनथटून आपापल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करत असताना पांढरी पँट, पांढरा शर्ट, त्यावर काळा कोट आणि त्यावर आपला बिल्ला लावून स्टेशन अधीक्षक मात्र त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी आपल्या ‘संस्थाना’तच तैनात असतो. स्टेशन अधीक्षक आणि प्रवासी यांचे नाते छोटय़ा स्थानकांवर तर जास्तच गहिरे असते. गावातल्या सरपंचाखालोखाल स्टेशन मास्तराचा मान असतो. लग्न होऊन सासरी चाललेल्या मुलींचा आईबापांनंतरचा नमस्कार स्टेशन मास्तरालाच घडतो. अशा स्थानकांवर एक गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी येण्याच्या मधल्या वेळेत स्टेशन अधीक्षकच तिकीट खिडकी उघडून तिकिटे विकतात. ती अतिरिक्त जबाबदारीही त्यांनाच पार पाडावी लागते.

आडगावच्या स्थानकाचा हा ‘संस्थानिक’ एखाद्या पावसाळी रात्री त्याच्या हद्दीतील एखादा पॉइंट क्लिअर करण्यासाठी पॉइंट्समनसोबत हातात टॉर्च घेऊन चालत जायलाही कमी करत नाही.. अंगावरची ‘संस्थानिका’ची झूल उतरवून त्या वेळी तो फक्त रेल्वे वाहतूक अव्याहत सुरू ठेवण्यासाठी लढणारा सैनिक बनलेला असतो!

रोहन टिल्लू @rohantillu

tohan.tillu@expressindia.com