मुंबई : लाच घेतल्याप्रकरणी राज्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. यंदा राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारप्रकरणी ७१३ गुन्हे नोंदवले आहेत. नाशिकमध्ये सर्वाधिक तर मुंबईत आश्चर्यकारकरीत्या कमी गुन्हे नोंदवले गेले आहेत. ७१३ पैकी ६७८ गुन्हे प्रत्यक्षात लाच घेतल्याप्रकरणी तर ३१ गुन्हे बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील लाचेच्या ६७८ गुन्ह्यांत ९९३ जणांना अटक करुन तीन कोटी १८ लाखांची लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक लाचखोर महसूल विभागातील असून १८० गुन्ह्यांत २५२ जणांना अटक करण्यात आली. या खालोखाल पोलिसांचा (१३७) क्रमांक लागतो. प्रथम श्रेणीतील ६२, द्वितीय श्रेणीतील १०१ तर तृतीय व चतुर्थ श्रेणीतील अनुक्रमे ५१० व ४७ तसेच इतर १०४ लाचखोरांचा समावेश आहे.

हेही वाचा…म्हाडा कोकण मंडळ सोडत २२६४ घरांसाठी १७ हजार अर्ज, अर्जविक्रीसाठी काही तास शिल्लक सोमवारी रात्री अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येणार

२०१४ मध्ये राज्यात भ्रष्टाचारप्रकरणी १३१६ गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून दरवर्षी गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. २०१५ मध्ये १२७९, २०१६ मध्ये १०१६, २०१७ मध्ये ९२५, २०१८ व २०१९ मध्ये अनुक्रमे ९३६ आणि ८९१ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० मध्ये करोना काळात गुन्हे नोंद होण्यात कमालीची घट झाली. त्यावेळीही ६६३ गुन्हे नोंदवले गेले. २०२१ मध्ये ७७३, २०२२ मध्ये ७४९ तर गेल्या वर्षी २०२३ मध्ये ८१२ गुन्ह्यांची नोंद झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.

हेही वाचा…नियोजन प्राधिकरणांचे काम कंपनीच्या धर्तीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला निर्देश

नाशिकमध्ये सर्वाधिक १५२ गुन्ह्यांची नोंद झाली असून या अंतर्गत २३४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो. पुण्यात १४९ गुन्ह्यांत २२३ जणांविरुद्ध प्रत्यक्ष लाचप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत भ्रष्टाचाराचे फक्त ३९ गुन्हे नोंदवून ५४ जणांना अटक करण्यात आली. ठाणे (७३), नागपूर (६२), अमरावती (६८), संभाजीनगर (११२) या शहरात एकूण ४१९ जणांना अटक करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statistics show significant drop in cases registered by state bribery prevention department mumbai print news sud 02