सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी संचालक मंडळावर असलेल्या साखर कारखान्याच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली.
पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्या साखर कारखान्याच्या बांधकामास विरोध करीत सोलापूरमधील आष्टी गावातील ग्रामस्थांनी मुंबई उच्च याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठाने मंगळवारी याचिकादारांचा युक्तिवाद मान्य करीत साखर कारखान्याच्या बांधकामाला स्थगिती दिली.
आष्टी येथे औदुंबरराव पाटील साखर कारखान्याचे बांधकाम सुरू आहे व भाग्यश्री पाटील कारखान्याच्या संचालक मंडळावर आहेत. हा साखर कारखाना सर्व नियम धाब्यावर बसवून बांधण्यात येत असल्याचा आरोप याचिकादारांच्या वतीने अ‍ॅड्.पटवर्धन यांनी केला. कारखान्यापासून सुमारे दीड किमी अंतरावर असलेल्या  तळ्यातून परिसरातील २५ गावांना पाणी मिळते. या साखर कारखान्यातून बाहेर फेकण्यात येणारी मळी व सांडपाण्यामुळे तळ्यात प्रदूषण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी कारखाना उभारण्यास विरोध केला. जुलै २०११मध्ये कारखान्याच्या बांधकामाला परवानगी नाकारल्यानंतरही बांधकाम सुरू राहिले. त्यामुळेच ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याचे पटवर्धन यांनी न्यायालयाला सांगितले. या कारखान्यातील टाकाऊ पदार्थामुळे तळ्यात प्रदूषण होईल. या परिसरातील सुमारे २०० जातींच्या पक्ष्यांचे अस्तित्त्वही धोक्यात येणार असल्यामुळे कारखान्याला परवानगी देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.