अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांनी संरक्षणमंत्र्यांसह घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, ‘चमत्कार घडतात, त्यामुळे आम्ही आशा सोडलेली नाही. पण सर्वात भीषण अशा बाबींना सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.’ या विधानातील दुसरा भाग शुक्रवारी प्रत्यक्षात आला. बुडालेल्या सिंधुरक्षकमधील पाच मृतदेह शुक्रवारी हाती लागले.
गुरुवारी पाणबुडीच्या एका भागापर्यंत पोहोचण्यात पाणबुडय़ांना यश आले, त्याच वेळेस खरे तर परिस्थितीची भीषणता स्पष्ट झाली होती. कारण आतमध्ये असलेले हायप्रेशर स्टीलचे दरवाजेही स्फोट आणि नंतरच्या आगीत वितळून गेल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय पाणबुडी जवळपास सागरतळाला गेल्याने शोधकार्य अडचणीचेच होते. आजूबाजूला असलेले चिखलमिश्रित पाणी आतमध्ये घुसलेले होते. १४ तारखेला दुपापर्यंत तर पाणबुडीचे तापमान एवढे जबरदस्त होते की, त्या आतमध्ये शिरलेल्या पाण्याला फुटलेली उकळी कायम होती. ते दुपारनंतर निवले, त्या वेळेस पाणबुडय़ांनी आतमध्ये शिरकाव करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली. गुरुवारी पहिल्या भागापर्यंत पोहोचलेले पाणबुडे शुक्रवारी पाणबुडीच्या दुसऱ्या भागापर्यंत पोहोचले. पाणी आणि तेलमिश्रित चिखलामुळे हायपॉवर दिवे वापरूनही कोणताही उपयोग होत नव्हता. कारण त्या चिखलमिश्रित पाण्यात काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अखेरीस एकाने आत शिरायचे आणि शक्य तितक्या बाजूंनी हायपॉवर दिव्यांचा झोत सोडायचा, असे करण्यास सुरुवात केली.
अखेरीस पहाटे पहिले यश आले ते भीतीदायक भयाणता घेऊनच. आतमध्ये असलेली विदीर्ण परिस्थिती पाहून पाणबुडय़ांनाही शोक अनावर झाला होता. हायपॉवर दिव्यांच्या प्रकाशात दिसले ते जवळपास कोळसा झालेले पाच मृतदेह. तेही अशा अवस्थेत होते की, हात लावायलाही जीव धजावू नये. अखेरीस भावनांवर मात करीत त्यांनी ते मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह ज्या दुसऱ्या भागातून बाहेर काढण्यात आले त्या भागामध्ये कोणतीही एक गोष्ट ठिकाणावर नव्हती. पाणबुडीच्या आतमध्ये असलेल्या सर्व यंत्रणा आणि इलेक्ट्रिकल यंत्रणा एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या होत्या. काहींची राखरांगोळी झाली होती. आतमध्ये असलेले हायप्रेशर स्टीलचे भाग तर वितळले तरी होते किंवा आगीमुळे ते विचित्र वाकले तरी होते. शुक्रवारी हाती लागलेले मृतदेहही ओळखण्यापलीकडचे होते. त्यामुळे ते मृतदेह कुणाचे आहेत, ते निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे ते मृतदेह नौदल रुग्णालय आयएनएचएस अश्विनीमध्ये पाठविण्यात आले आहेत. रात्री उशिरा ते जे जे रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले त्या वेळेस शोधकार्यामध्ये गुंतलेले नौसैनिक काही काळ सुन्न झाले होते.
गुन्हा दाखल
भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घातपात आहे का अथवा कशामुळे ही दुर्घटना घडली आदी प्रकरणी पोलिसांमार्फत चौकशी होणार आहे. दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा