लालबाग, वरळी, कांदिवलीतून सुरुवात

इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : फरशा किंवा पेव्हर ब्लॉक उखडल्यामुळे वारंवार पदपथांची होणारी दुर्दशा थांबवण्यासाठी पालिकेने यापुढे स्टेन्सिल काँक्रीटने पदपथ तयार करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता मुंबईतील लालबाग, परळ, वरळी आणि कांदिवलीतील पदपथांची निवड करण्यात आली आहे.

 गेल्या काही वर्षांत पदपथावर पेव्हर ब्लॉक टाकण्याचे पेव फुटले होते. मात्र मोठय़ा प्रमाणावर पादचाऱ्यांची वर्दळ, उपयोगिता संस्थांद्वारे चर, खड्डे खणणे, पाणी साचून राहणे, जलवाहिन्यांद्वारे होणारी गळती यामुळे हे पदपथ वारंवार खराब होतात. दर एक, दोन वर्षांनी उखडलेले पेव्हर ब्लॉक व फरशा काढून पुन्हा नव्याने बसवाव्या लागतात. त्यामुळे पालिकेला देखभालीसाठी दरवर्षी वारंवार खर्च करावा लागतो. शिवाय पादचारी अडखळून पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पदपथांच्या दुर्दशेवरून पालिकेवर नेहमीच टीका होत असते. त्यामुळे पालिकेच्या रस्ते विभागाने आता कमी रुंदीचे पदपथ स्टेन्सिल काँक्रीटने तयार करण्याचे ठरवले आहे.

माजी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबईतील पदपथांच्या सुधारणेसाठी स्टेन्सिल काँक्रीटचा नवा पर्याय आणला होता. प्रायोगिक तत्वावर मुंबईतील काही विभागांमधील एका रस्त्याची याकरीता निवड करण्यात आली होती. त्याअंतर्गत शिवडी येथे नगरसेवक सचिन पडवळ यांच्या विभागात विठ्ठल विनायक सदन जवळील पदपथ स्टेन्सिलने तयार करण्यात आला होता. या पदपथाला दोन वर्षे झाली असून हा पदपथ आजही सुस्थितीत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. दरम्यान, याच धर्तीवर आता शिवडी व लालबाग परळ व कांदिवलीतील आणखी काही पदपथ स्टेन्सिलने तयार करण्यात येणार आहेत. यापूर्वीचे पदपथ हे नगरसेवक निधीतून तयार करण्यात आले होते. मात्र, आता याकरिता रस्ते विभागाने निधी मंजूर केला असून पदपथांची निवड केली जात आहे. या पदपथांचा हमी कालावधी पाच वर्षांचा आहे.

२०० कोटींची तरतूद

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, सोयीसाठी पदपथांच्या एकंदरीत सौंदर्याकरिता १६० किमी लांबीच्या १४९ पदपथांची निवड करण्यात आली आहे. पदपथ व वाहतूक बेट आणि उड्डाणपुलाखालील मोकळय़ा जागांच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने यावर्षीच्या अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

निवड झालेले पदपथ.. 

एम. जी. रोड, एस. व्ही. रोड ते लिंक रोड, कांदिवली पश्चिम  अशोक चक्रवर्ती रोड, ९० फूट डीपी रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व बी. जी. देवरुखकर मार्ग, लालबाग दादासाहेब फाळेक मार्ग, दादर पूर्व रफी अहमद किडवाई मार्ग, अभ्युदय नगर  शिवडी, तर वरळीतील  दैनिक शिवनेर मार्ग, इ. मोसेज मार्ग,  प्रभादेवीतील एन. एम. जोशी मार्ग, सयानी रोड, शंकर घाणेकर मार्ग, दादर पश्चिमेकडील गोखले मार्ग.

Story img Loader