डॉकयार्ड रोड येथे मंगळवारी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात अद्याप गुन्ह्याची नोंद केलेली नाही. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या चौकशीचा अहवाल आल्यावर गुन्हा नोंदविण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले होते.
निष्काळजीपणामुळे झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाने तात्काळ एका तंत्रज्ञाला कोणतीही चौकशी न करता निलंबित केले आहे. मात्र या कर्मचाऱ्याला विनाचौकशी निलंबित केल्याबद्दल एकाही कामगार संघटनेने अद्याप प्रशासनाकडे विचारणा केलेली नाही. या अपघातातील जखमींची जबानी नोंदण्यात आली असली तरी अद्याप कोणावरही गुन्हा नोंदण्यात आला नसल्याचे वडाळा येथील वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षक राठोड यांनी सांगितले. रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्या अहवालाची आम्ही वाट पाहात आहोत. मात्र बुधवारी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला पोलिसांकडून पत्र पाठविण्यात आले असून हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मागविण्यात आली असल्याल्याचेही राठोड यांनी सांगितले. रेल्वेच्या हद्दीत प्रवाशांच्या जिविताशी संबंधित कोणतीही घटना घडल्यास तात्काळ रेल्वे पोलीस गुन्हा दाखल करतात. रेल्वे सुरक्षा दलाकडून एखादा गुन्हा नोंदला गेला तर तोही रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात येतो. डॉकयार्ड रोड दुर्घटनेप्रकरणी मात्र रेल्वे पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदविलेला नाही.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा